उपजिल्हाधिकाऱयांची मोले पंचायत मंडळ व ग्रामस्थांशी चर्चा
प्रतिनिधी / धारबांदोडा
लॉकडाऊन हा केंद्र सरकारचा निर्णय असल्याने, त्यात आपल्याला हस्तक्षेप करता येणार नाही. मात्र नागरिकांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या वरिष्ठांपर्यंत पोचविल्या जातील. शिवाय काही गोष्टींवर नियंत्रण आणता येईल असे आश्वासन धारबांदोडा उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक यांनी बुधवारी मोले पंचायत मंडळ व नागरिकांशी झालेल्या चर्चेदरम्यान दिले.
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने व हे सर्व रुग्ण परराज्यातून गोव्यात येत असल्याने मोले चेक नाक्यावरून येणाऱया वाहनांना प्रवेश बंद करण्याची मागणी मोले ग्रामस्थांनी केली होती. त्यासाठी मोले पंचायत मंडळावर दबाव वाढत होता. या पार्श्वभूमिवर धारबांदोडा तालुक्याचे मामलेदार अभिर हेदे यांनी गेल्या आठवडय़ात पंचायत मंडळ व नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या लेखी स्वरुपात देण्याची सूचना केली होती.
मामलेदारांच्या या सूचनेनंतर मोले पंचायतीने त्याच दिवशी धारबांदोडा उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक यांना लेखी निवेदन सादर केले होते. त्यानुसार बुधवारी सकाळी उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक, मामलेदार अभिर हेदे व पिळये प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. संदेश मडकईकर यांच्या उपस्थितीत मोले पंचायत मंडळ व नागरिकांशी चर्चा झाली. कुळे पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रज्योत फडते हेही यावेळी उपस्थित होते.
गोव्यात कोरोनाबाधीतांची संख्या वाढली तरी त्याचा सामाजिक प्रसार झालेला नाही. धारबांदोडा तालुक्यात तर अजून एकही रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी गोंधळून जाऊ नये. कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी सरकार, प्रशासन, आरोग्य कर्मचारी व पोलीस यंत्रणा योग्य ती खबरदारी घेत आहेत. त्यांना साथ देण्यासाठी नागरिकांनीही नियमांचे पालन केले पाहिजे. सर्वच गोष्टय़ा सरकार सरकारवर सोपवित येणार नाहीत. एखादा संशयित आढळल्यास नागरिकांनी त्यांची माहिती संबंधित यंत्रणांकडे पाठविणे आवश्यक आहे. सामाजिक अंतर राखतानाच मास्क वापरणे व इतर नियमावलींचे पालन करण्याचा सल्ला डॉ. संदेश मडकईकर यांनी दिला.
वामन खांडेपारकर, शरदचंद्र खांडेपारकर, प्रसाद पांगम यांनी ग्रामस्थांतर्फे विविध प्रश्न मांडले. सरपंच स्नेहलता नाईक, उपसरपंच सुशांत भगत, पंचसदस्य रामकृष्ण गांवकर, समर कदम, बाबू शेळके, तन्वी केरकर, राजेश सांगोडकर यांनी चर्चेत भाग घेतला.
बरकटे येथे रस्त्याच्या बाजूला पार्क करून ठेवणाऱया वाहनांवर नियंत्रण ठेवून ही वाहने रस्त्याच्या एकदम बाजूला पार्क करण्याची सूचना केली. सुकतळी येथे खाण सध्या जी खनिज वाहतूक सुरु आहे, तेथे ट्रकचालकांकडून कोणत्याच प्रकाराच्या नियमावलीचे पालन केले जात नाही असा आरोप यावेळी नागरिकांकडून करण्यात आला. दरम्यान, दक्षिण फोंडय़ाचे पोलीस उपअधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांनी मोले येथे भेट देऊन पोलीस व उपजिल्हाधिकाऱयांशी सुरक्षेच्या उपाययोजनासंबंधी चर्चा केली.