प्रतिनिधी / धारबांदोडा
चोरटय़ा मार्गाने दारुची वाहतूक करणारा ट्रक अबकारी खात्याच्या पथकाने पकडला मोले चेक नाक्यावर असून अंदाजे साडेपाच लाख रुपये किंमतीचा दारु साठा त्यातून जप्त करण्यात आला आहे. मंगळवारी उशिरा रात्री ही कारवाई करण्यात आली. अबकारी खात्याचे निरीक्षक रोहित देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार एपी 39 टीडी 1629 या क्रमांकाचा हा ट्रक दारुचा साठा घेऊन गोव्यातून कर्नाटककडे निघाला होता. मोले चेक नाक्यावर अबकारी खात्याच्या पथकाने हा ट्रक अडवून झडती घ्यायला सुरुवात केली असता, अंधाराचा फायदा घेऊन ट्रकचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला शिताफीने पकडण्यात यश आले. ट्रकमध्ये साधारण 305 दारुचे खोके प्लास्टिकखाली लपवून ठेवण्यात आले होते, जे जप्त करण्यात आले आहेत. अबकारी खात्याचे जितेंद्र आडपईकर, सुनील नाईक, महादेव गावकर, दशरथ गांवस, आशिष गांवकर व दीपक प्रभू यांनीही कारवाई केली.