ऑनलाईन टीम / यंगून :
म्यानमारमधील लष्करशाहीला विरोध करत फेसबुकनेही तेथील लष्कराचे मुख्य पेज आपल्या प्लॅटफॉर्मवरुन डिलीट केले आहे. हिंसाचाराला पायबंद घालण्याच्या कायद्यांतर्गत फेसबुकने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येते.
म्यानमारमधील लष्कराने 1 फेब्रुवारीला लोकशाही सरकार उलथवून लावत एकहाती सत्ता हाती घेतली. लष्कराच्या या बंडाला देशभरातून कडाडून विरोध सुरू असून, सातत्याने या देशात लष्करविरोधी आंदोलन सुरू आहे. लष्करी प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी गोळीबार केल्याची घटना समोर आली असून, यात दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर फेसबुकने लगेचच हिंसाचारास वारंवार प्रोत्साहन देणे आणि आमच्या प्लॅटफॉर्वरील नियमांचे सातत्याने उल्लंघन केल्याचे कारण देत ‘टाटमाडॉ ट्रू न्यूज इन्फॉर्मेशन टीम’ हे लष्कराचे पेज डिलीट केले.