ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
म्यानमारमधील लष्कराने लोकशाही सरकार उलथवून लावत एकहाती सत्ता हाती घेतली आहे. यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी लष्कराच्या बंडावर नाराजी व्यक्त करत म्यानमारवर नवीन आर्थिक निर्बंध लावण्याचा इशारा दिला आहे.
म्यानमारमध्ये आंग सान स्यू की यांचे लोकशाही सरकार अस्तित्वात होते. लष्कराने हे लोकशाही सरकार उलथवून लावल्यानंतर आंग सान स्यू की, राष्ट्रपती विन मिन्ट यांसह काही महत्वाच्या नेत्यांना अटक केली. लष्कराच्या कृत्यावर अमेरिकेने जोरदार टीका केली आहे. दरम्यान, म्यानमारमधील परिस्थितीसंदर्भात आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाने आपत्कालीन बैठकही बोलवली आहे.
म्यानमारमधील परिस्थितीवर चीनही लक्ष ठेवून आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी म्हटले आहे की, ‘म्यानमारमधील सर्व पक्ष संविधान आणि कायदेशीर चौकटीनुसार आपले मतभेद सोडवतील तसेच राजकीय व सामाजिक स्थिरता राखतील.’