उद्योगाचे वित्तीय मूल्य 28 लाख कोटींवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत म्युचुअल फंडस् उद्योगाचे वित्तीय मूल्य 28 लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या फंडस्मध्ये छोटय़ा शहरातील लोकांचा गुंतवणूकीकडे कल वाढला असल्याचे दिसून आले आहे. गुंतवणुकीचा एक पर्याय म्हणून म्युचुअल फंडचा विचार केला जात आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांचा ओढा या फंडांकडे वळला असल्याचेही दिसून आले आहे.
एएमएफआय या म्युचुअल फंड उद्योगाशी संबंधीत संघटनेकडून सदरची माहिती देण्यात आली आहे. मागच्या वर्षी सेबीने म्युचुअल फंड कंपन्यांवर दबाव टाकला होता. आपल्या गुंतवणूकीत वाढीसाठी कंपन्यांनी छोटय़ा शहरांकडे वळावे असे सेबीने सुचवले होते.
कोरोनाकाळात 50 लाख डिमॅट खाती
शेअर्ससोबत इक्वीटी फंडांमध्ये आणि इतर फंडात गुंतवणुकीसाठी डिमॅट खाते उघडणे गरजेचे असते. एप्रिलनंतर केवळ 6 महिन्यात 50 लाखहून अधिक डिमॅट खाती उघडण्यात आल्याचे सांगण्यात येते. अनेकांनी वेतन कपात व नोकरीवरून कमी केल्यानंतर गुंतवणूकीकडे जास्त करून लक्ष दिल्याचे दिसले. त्यातही गुंतवणूकीचा क्रम ठरवताना म्युचुअल फंडांचा विचार आवर्जून केल्याचे पाहायला मिळाले.