प्रतिनिधी / मिरज
तालुक्यातील म्हैसाळ येथे माहेरी आलेल्या आपल्या पत्नीशी जोरजोरात भांडण करुन हवेत गोळीबार करत दशहत माजविल्याप्रकरणी राजू बाळासा उर्फ बाळाशी जाधव (रा. मायाक्का चिंचणी, ता. रायबाग) याच्यावर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला. याबाबत महेश रमेश शिंदे (वय 31, रा. म्हैसाळ) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, महेश शिंदे यांचे चुलते सुरेश शिंदे हे म्हैसाळ गावात अंबिकानगर येथे राहण्यास आहेत. त्यांची बहीण भारती शिंदे हिचा राजू जाधव याच्याशी विवाह झाला असून, काही दिवसांपूर्वी कौटुंबिक कारणावरुन त्यांचा वाद झाल्याने भारती ही सध्या म्हैसाळ येथे राहण्यास आली आहे.
बुधवारी सकाळी सव्वादहा वाजता राजू जाधव हा आपली स्कार्पिओ गाडी घेऊन म्हैसाळ अंबिकानगर येथे सुरेश शिंदे यांच्या घरासमोर आला. त्यावेळी भारती शिंदे आणि राजू जाधव यांच्यात वाद सुरू झाला. राजू हा जोरजोराने ओरडून अश्लिल शिवीगाळ करीत बहीण भारती हिच्याशी भांडण करीत होता. त्यावेळी सुरेश शिंदे आणि सहदेव जगताप हे दोघे भांडण सोडविण्यास गेले असता, राजू याने त्यांनाही शिवीगाळ केली. यावेळी त्याने स्कार्पिओमध्ये सिटवर ठेवलेली लाकडी दांडय़ांची, लांब नळीची बंदूक घेऊन हवेत गोळीबार करुन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. गोळीबारचा जोरात आवाज आल्याने ग्रामस्थ मोठय़ा संख्येने जमा झाले. त्यानंतर राजू याने बंदुकीच्या पुंगळ्या घेऊन पलायन केले, असे महेश शिंदे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
म्हैसाळ गावात हवेत गोळीबार करुन दशहत निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे समजताच पोलीस उपाधीक्षक संदीपसिंग गील यांच्यासह काही पोलिस कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आरोपीने पलायन केले होते. शिंदे यांच्या फिर्यादीनुसार राजू जाधव याच्यावर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्यास अटक झाली नव्हती.