प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील विजयनगर म्हैसाळ येथे बंद घर फोडून चोरटय़ांनी एक लाख, 40 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. मंगळवारी सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. भरवस्तीत भरदिवसा घरफोडी झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. याबाबत आण्णासाहेब शिवराय गुळेदार (वय 42, रा. कोटीवाला मळा, म्हैसाळ) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर यांनी घटनास्थळी पाहणी केली.
आण्णासाहेब गुळेदार हे मंगळवारी दुपारी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरटय़ांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून काढून घरात प्रवेश केला. व आतील तिजोरी फोडून त्यातील तीन तोळ्याची सोन्याची चेन व पाच ग्रॅम वजनाचे सोन्याची कर्णफुले असा एक लाख, 40 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.
गुळेदार हे काळी वेळानंतर घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा उघडल्याचे दिसला. त्यांनी आत जावून पाहणी केली असता तिजोरी फोडून चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत त्यांनी मिरज ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ठसे तज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर यांनीही भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान, मिरज तालुक्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून चोऱयांचे सत्र सुरुच आहे. मोबाईल आणि मोटारसायकल चोरी तर नित्याची बाब बनली आहे. आता भरदिवसा घरफोडी झाल्याने ग्रामस्थ भयभयीत झाले आहे. पोलिसांनी या चोरटय़ांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.