बेंगळूर/प्रतिनिधी
म्हैसूर दसरा उत्सवाची लगबग सुरु झालेली आहे. दरम्यान यावर्षी कोरोनामुळे दसरा उत्सवाला उपस्थित राहणारे पाहुणे, ड्युटीवरील कर्मचार्यांसाठी कोरोना चाचणी करणे अनिवार्य असेल. कोरोना अहवाल निगेटिव्ह असेल तरच प्रवेश दिला जाईल. याबाबत राज्याचे मुख्य सचिव टी. एम. विजय भास्कर यांनी आदेश जारी केले आहेत. कोरोना तपासणी अहवाल १४ ऑक्टोबर नंतरचा असावा असे नमूद केले आहे.
विनामूल्य कोरोना चाचणी
उत्सव सुरू होण्यापूर्वीच म्हैसूर शहरातील अनेक ठिकाणी विनामूल्य चाचण्यांची व्यवस्था केली जाणार आहे. मुख्य सचिवांनी म्हैसूर जिल्हा प्रशासनाला तसे निर्देश दिले आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, केंद्र व राज्य शासनाने जारी केलेल्या विविध मार्गदर्शक सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि भारतीय दंड संहितेच्या कलम १८० अन्वये गुन्हा नोंदवून कठोर कारवाई केली जाणार आहे.
उद्घाटन सोहळ्याला मर्यादित लोकांची उपस्थितीत
दसरा मोहत्सवाला यावेळी केवळ अंबा विलास महलच्या आवारात आयोजित कार्यक्रमांमध्ये मर्यादित लोकांना भाग घेता येणार आहे. उपस्थित राहणाऱ्या लोकांना कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक असेल. चामुंडी टेकडीवर आयोजित दसरा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात फक्त २०० लोक आणि जंबो राईडमध्ये ३०० लोक सहभागी होऊ शकतात. राजवाड्याच्या आवारात १७ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये केवळ ५० लोक सहभागी होतील. १७ ते २४ ऑक्टोबर दरम्यान सायंकाळी ७ ते ९ या वेळेत रंगीबेरंगी दिवे लावले जातील. या उत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेकडे अधिक लक्ष देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.