शहरातील मनीष मानधना गँगचे कृत्य
प्रतिनिधी / इचलकरंजी
चंदूर (ता. हातकणंगले) येथील यंत्रमाग कारखानदाराकडे इचलकरंजीतील एमएम उर्फ मनीष सत्यनारायण मानधना या रेकॉर्डवरील गँगने पोलिसात दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा. त्याचबरोबर २५ लाखांची खंडणी द्यावी, अन्यथा कुटूंबासह संपवण्याची धमकी दिल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी गँगचा म्होरक्या एमएम उर्फ मनीष मानधना, त्याचा मुलगा योगेश मानधनासह सात साथीदारांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. हे सातजण रेकार्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात इचलकरंजीतील पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत.
तसेच ही गँग नुकतीच १० लाखांच्या चोरीच्या गुन्ह्यातून अटकपूर्व जामीनावर बाहेर आली आहे. चंदूर येथील श्री बिरदेव मंदिराशेजारी धुळाप्पा आप्पा पुजारी राहत असून, ते यंत्रमाग कारखानदार आहेत. त्यांच्या यंत्रमाग कारखान्यातून काही दिवसांपूर्वी सुमारे १०.५० लाख किंमतीचे साहित्य चोरीस गेले होते.
या चोरीच्या घटनेची गांभीर्याने दखल घेवून तपास करीत, पोलिसांनी इचलकरंजीतील एमएम उर्फ मनीष मानधना या गँगविरोधी गुन्हा दाखल केला. या दाखल गुन्ह्याची चाहूल लागताच गँग प्रमुख एमएम उर्फ मनीष मानधना, त्याचा मुलगा योगेश मानधना, साथीदार विकास गाताडे, विजय गलगले, चंद्रकांत खानाज, चंद्रकात खानाज यांचा मुलगा, अशोक दायमा (सर्व रा. इचलकरंजी) हे सात जण पसार झाले. त्यांनी या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा. याकरीता न्यायालयात अर्ज दाखल केला. या दाखल अर्जावर सुनावणी होवून या गँगचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला. याला काही दिवसांचा कालावधी लोटताच पुन्हा या गँगने फिर्यादी धुळाप्पा पुजारी या यंत्रमाग कारखानदाराला पोलिसांत दाखल केलेला गुन्हा माघारी घे, नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही.
त्याचबरोबर दोन दिवसांत २५ लाखांची खंडणी आम्हाला द्यावी. अन्यथा तुPयासह कुटूंबासह संपवून टाकू, अशी धमकी दिली. याप्रकरणी पुजारी यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली. यांची गांभीर्याने दखल घेवून या गँगविरोधी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याची चाहुल लागताच ही गँग शहरातून पसार झाली आहे.