भारतीय हवामान विभागाचा डिसेंबर ते फेबुवारीदरम्यानचा अंदाज
पुणे/ प्रतिनिधी
पूर्वोत्तर भारत, पश्चिम किनारपट्टी तसेच दक्षिणकडचा भाग वगळता भारताच्या इतर भागात डिसेंबर ते फेब्रुवारी हे थंडीचे महिने अधिक थंड राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने रविवारी वर्तविला.
भारतीय हवामान विभागाने हिवाळय़ातील दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. याकाळात उत्तर, मध्य भारत, वायव्य भारत तसेच पूर्व भागातील काही ठिकाणांमध्ये किमान तापमान हे सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. पूर्वोत्तर भारताचा काही भाग, पश्चिम किनारपट्टीवरील काही विभाग तसेच दक्षिणेकडे किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे.
दुसरीकडे या कालावधीत वायव्य भागातील काही विभाग, उत्तर, पूर्व तसेच पूर्वोत्तर भागातील काही विभागांमध्ये, कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहील, तर मध्य भारत व दक्षिणेच्या तुरळक भागात कमाल तापमान हे सरासरीपेक्षा जास्त राहील, असे हवामान विभागाने सांगितले आहे.