सौदी अरेबियाच्या सरकारने दिली अनुमती
वृत्तसंस्था/ रियाध
चालू वर्षी विदेशी भाविकांना हजयात्रा करण्याची अनुमती देण्यात येणार आहे. चालू वर्षात हजयात्रा सर्वांसाठी खुली राहणार असली तरीही कोविड-19 विषयक सुरक्षा नियमांचे पालन अनिवार्य असणार आहे. सौदी अरेबिया यंदा हजसाठी जगभरातील 60 हजार लोकांना अनुमती देणार आहे. याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा 18 वर्षांपेक्षा कमी आणि 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना हजवर येण्याची अनुमती नसल्याचे त्यांनी स्पष्ट पेले आहे.
मागील वर्षी कोरोना महामारीमुळे नियमित हजयात्रा होऊ शकली नव्हती. केवळ सौदी अरेबियातील 1000 जणांना हजयात्रेची अनुमती मिळाली होती. कोरोना महामारीमुळे यंदा हज यात्रेचा खर्च वाढणार आहे. यंदा हज यात्रा 17 जुलैपासून 22 जुलैपर्यंत चालणार आहे.
लसीकरण झालेल्या लोकांनाच हजयात्रेची अनुमती मिळणार आहे. तसेच सौदी अरेबियात पोहोचल्यावर तीन दिवसांपर्यंत क्वारेंटाईनमध्ये राहणे अनिवार्य आहे. सौदी अरेबियाने आतापर्यंत फायजर, ऑक्सफोर्ड, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन या कंपन्यांच्या लसींना मान्यता दिली आहे.