बाळेपुंद्री / वार्ताहर
कर्नाटक-महाराष्ट्र व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लमा देवीचे सुमारे चार लाखाहून अधिक भाविकांनी सोमवारी दर्शन घेतले. उदे ग आई उदे च्या गजरात ढोल ताशांच्या तालात व भंडाऱयाची मुक्तपणे उधळण करत यल्लम्मा डोंगर परिसर अक्षरशः उधळूण सोडला होता. शुक्रवारी शाकंभरी पौर्णिमा असल्याने यानिमित्त सौंदत्तीच्या डोंगरावर पाच लाखाहून अधिक भाविकांचा जनसागर लोटला होता. शुक्रवारी पहाटेपासूनच बस, कार, टमटम, रिक्षा, टॅक्टर, मोटारसायकल वाहनासह देवीच्या दर्शनाला निघालेले चित्र पहावयास मिळत होते. त्यामुळे डोंगर फुलून गेला होता. देवीच्या दर्शनासाठी तीन ते चार तास रांगेत उभे राहून देवीचे दर्शन घेतले.
भाविकांची एकच गर्दी
बेळगाव, चंदगड, कोल्हापूर, सातारा, गोवा, आजरा, गडहिंग्लज, पुणे, धारवाड, विजापूर व गुलबर्गा तालुक्यातील विविध गावच्या भाविकांचे लोंढे आल्याने डोंगर फुलून गेला होता. बेळगाव जिल्हय़ातील स्थानिक भाविकही सायकल, दुचाकीवाहनाचा आधार घेत डोंगर गाठल्याने दोन कि. मी. पर्यंत गर्दी होती. शुक्रवारी पहाटे हुली गावचे हिरेमठ बंधू स्वामीजीच्या उपस्थितीत देवीची विधीपूर्वक पूजा झाल्यानंतर देवीच्या दर्शनाचा मार्ग मोकळा झाला होता. यावेळी देवस्थानचे रवी कोटारगस्तीसह कर्मचारी उपस्थित होता.
जोगुळभावी पुंडात स्नानासाठी गर्दी
यात्रेनिमित्त डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जोगुळभावी पुंडात भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली होती. देवीच्या दर्शनानंतर मंदिरापासून 3 कि. मी. अंतरावर असलेल्या पारसगड येथील रामलिंग देवस्थानात दर्शन घेतले. तसेच श्रीमौनेश्वर व परशुराम मंदिरातही दर्शनसाठी गर्दी झाली होती. दुपारी गर्दी वाढल्याने मंदिराच्या कार्यकर्त्यांना व सौंदत्ती पोलिसांना परिश्रम घ्यावे लागले.
पडल्या भरण्याचा कार्यक्रम उत्साहात
शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी पडल्या भरण्याच्या धार्मिक कार्यक्रम असतो. या दिवशी कडबाच्या पोळय़ा, पुरण पोळय़ा, वांग्याची भाजी, भात, तूप या पदार्थांचा नैवेद्य भाविक देवीला समर्पित करण्याची प्रथा आहे. त्यानुसार पडल्या भरण्याच्या धार्मिक विधीही पार पडला.
पाण्यासाठी भाविकांची झुंबड
धारवाड जॅकवेलमधून डोंगरावर होणारा पाणी पुरवठा तांत्रिक दोषामुळे ठप्प झाल्याने यात्रेकरूना पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली. रांगेत उभे राहूनही पाणी मिळत नसल्याने भाविक पाणी मिळविण्यास भाविक धडपड करत असल्याचे चित्र डोंगरावर दिसत होते. यावेळी देवस्थान व्यवस्थापन यांना फोनद्वारे संपर्क साधला असता त्यांनी पाणी पुरवठा करणाऱया पाईपमध्ये दोष निर्माण झाल्याने पाणी पुरवठा ठप्प झाल्याचे सांगून लागलीच नव्याने टँकर मागवून पुरवठा सुरू करण्यात आल्याचे सांगितले.
वाहतूक विस्कळीत
डोंगरावर हुबळी-धारवाड मार्गे, बागलकोट सौंदत्ती मार्गे व बेळगाव सौंदत्ती मार्गे व विविध भागातून आलेल्या राज्य परिवहनच्या बसेस मिळेल त्याठिकाणी उभ्या केल्याने डोंगरावर वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक कोंडीमुळे फिरनेही मुष्कील झाले होते.