विवेक ढापरे यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
वार्ताहर/ कराड
कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना एक वर्षाची मुदतवाढ दिलेली असतानाही त्यांची जळगाव जिल्हय़ातील भुसावळ येथे बदली करण्यात आली आहे. प्रशासनाने डांगे यांची बदली रद्द करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक ढापरे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटल्याप्रमणे, सध्या राज्यात कोरोनाचे संकट सुरू असून कराड शहरातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या साथीमध्ये कराड शहरात मुख्याधिकारी डांगे यांनी अनेक कल्पक योजना आखून कराडला या साथीपासून दूर ठेवण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. कोरोना साथीत सुरुवातीपासूनच डांगे यांनी नियोजनबद्ध काम केले. महाराष्ट्रात पहिल्यांदाच घरपोच भाजी पोहोचवण्याचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला. गावाची स्वच्छता, निर्जंतुकीकरण, कचरा विलगीकरण यातील नियमितता, प्रत्येक सोमवारी शहरातील विविध घटकांबरोबर संवाद साधून कोरोनाकाळात कराड सुरक्षित राखले.
स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये कराडचा देशपातळीवर प्रथम क्रमांक आला असून या वर्षीही तो येणे निश्चित आहे. बाराडबरी कचरा प्रकल्पाचे आज नंदनवन झाले. संपूर्ण देशात आदर्श असणारा हा प्रकल्प थोडासा अपूर्णावस्थेत आहे. तो पूर्ण होण्यासाठी त्यांना मुदतवाढ मिळणे गरजेचे आहे.
या प्रकरणी आपण स्वत: लक्ष घालून डांगे यांची बदली रद्द करावी; अन्यथा कोरोना काळातही याचे तीव्र पडसाद उमटतील व नाईलाजाने कराडकरांना शांततामय आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.