क्रीति सेनॉनने स्ट्रगलच्या दिवसांचा केला खुलासा
बॉलिवूडची परमसुंदरी क्रीति सेनॉन स्वतःच्या अभिनयाच्या बळावर चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करण्यास यशस्वी ठरली आहे. आता तिने बॉलिवूडमधील स्वतःच्या स्ट्रगलला आठवत आपण कित्येक नकार पचविले असल्याचे विधान केले आहे.
प्रारंभिक काळात अनेक ऑडिशन्स दिल्या, परंतु तेथे एखाद्या स्टार किड्स किंवा मोठय़ा कलाकाराचीच निवड केली जात होती, यामुळे अत्यंत दुःखी व्हायचे. कुणाला घ्यायचेच नव्हे तर नवख्यांची ऑडिशन का घेतली जाते असे वाटायचे. स्ट्रगलच्या काळात अनेक चित्रपट मिळाले, परंतु त्यात मला छोटय़ा भूमिका दिल्या जात होत्या. या भूमिका मी नाकारण्याचा निर्णय घेतला होता असे ती सांगते.
तुम्ही अधिक वेळ कामाशिवाय राहू शकत नाही. माझ्याकडे काम नसताना मी दिवसातून 10 वेळा आईला फोन करायचे. चित्रपटसृष्टीत आपले काहीच घडणार नसल्याचे मला वाटू लागले होते असे तिने म्हटले आहे.
क्रीति सेनॉन लवकरच अक्षय कुमारसोबत बच्चन पांडे या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात ती पत्रकाराची भूमिका साकारत आहे. फरहाद यांचे दिग्दर्शन लाभलेला हा चित्रपट 4 मार्च रोजी प्रदर्शित होऊ शकतो. याचबरोबर क्रीति ही आदिपुरुष, शहजादा, गणपत यासारख्या बिगबजेट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारत आहे.