चेन्नई / वृत्तसंस्था
जागतिक क्रिकेटमध्ये कोरोनामुळे आमुलाग्र बदल झाले असून बायो-बबल प्रणालीमुळे सर्वच खेळाडूंना त्यांचे मानसिक स्वास्थही प्राधान्याने जपावे लागणार आहे. यामुळे, ही परिस्थिती पूर्वपदावर येईतोवर जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू प्रत्येक दौऱयात खेळताना दिसून येणार नाहीत, असे इंग्लंडचा धडाकेबाज यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलर शनिवारी म्हणाला. ‘आपल्याला मजबूत संघच खेळवायचा असतो. पण, दुर्दैवाने सध्या ते शक्य दिसत नाही’, असे निरीक्षण त्याने नोंदवले.
इंग्लिश संघव्यवस्थापनाने भारताविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून जॉनी बेअरस्टोला विश्रांती दिली होती. त्या पार्श्वभूमीवर बटलर बोलत होता. श्रीलंका व भारत असे लागोपाठ दौरे असताना त्यात ईसीबीला रोटेशन पॉलिसी राबवावी लागणारच होती, असे तो म्हणाला. भारताविरुद्ध मालिकेत स्वतः बटलर शेवटच्या दोन कसोटी सामने खेळणार नाही, अशी शक्यता आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यानंतर तो मायदेशी रवाना होईल व त्यानंतर पुढे मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी पुन्हा भारतात येईल, असे संकेत आहेत.
‘सध्याची स्थिती आव्हानात्मक आहे. पण, अवघे जगच कठीण कालावधीतून मार्गोत्कमण करत आहे. कोव्हिड-19 मुळे अनेक चढउतार पहावे लागले आहेत आणि यातूनही क्रिकेट मालिका होत आहेत, हे सुदैव मानायला हवे’, असे बटलर पुढे म्हणाला. ‘बायो-बबल प्रणालीमुळे सातत्याने क्वारन्टाईन रहावे लागणे, कुटुंबापासून दूर रहावे लागणे आणि हॉटेलबंद असणे अशा अनेक प्रतिकूल बाबी पत्कराव्या लागतात. त्यामुळे ईसीबीने खेळाडूंना रोटेट करण्याचा उत्तम पर्याय निवडला आहे’, याचा त्याने पुढे उल्लेख केला.
इंग्लिश त्रिकुटाचा शनिवारी कसून सराव
चेन्नई ः आघाडीचा अष्टपैलू बेन स्टोक्स, जलद गोलंदाज जोफ्रा आर्चर व राखीव सलामीवीर रोरी बर्न्स यांनी शनिवारी चेपॉकवर कसून सराव केला. भारतात दाखल झाल्यानंतर इंग्लिश चमूचे हे पहिले सराव सत्र होते. भारतात सहा दिवसांचे सक्तीचे क्वारन्टाईन पूर्ण केल्यानंतर त्यांना सरावासाठी परवानगी मिळाली. इंग्लिश संघातील अन्य खेळाडूंनीही कोव्हिड-19 चाचणी पार केली आहे.
बेन स्टोक्स, आर्चर व रोरी बर्न्स यांचा यापूर्वी लंकेविरुद्ध मालिकेसाठी इंग्लिश संघात समावेश नव्हता. त्यामुळे, ते भारतात लवकर दाखल होऊ शकले. कोरोना चाचणीचे तीन अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सराव सुरु करता आला. पुढील तीन दिवसात हे तिघेही सलग सराव करतील आणि रोज त्यांचे हे सराव सत्र प्रत्येकी दोन तासांचे असेल, असे इंग्लिश संघाचे माध्यम व्यवस्थापक डॅनी ऱयुबेन यांनी नमूद केले. पूर्ण इंग्लिश पथकाच्या एकत्रित सरावाला दि. 2 फेबुवारीपासून प्रारंभ होणे अपेक्षित आहे. उभय संघातील पहिली कसोटी दि. 5 फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे.