केंद्र-राज्य सरकारच्या योजनेंतर्गत एकाचवेळी रेशनचा होणार पुरवठा
प्रतिनिधी/ बेळगाव
जून महिन्यातील रेशनचा पुरवठा शुक्रवार दि. 5 पासून करण्यात येणार आहे. कोविड-19 च्या परिस्थितीमुळे नागरिकांना अनुकूल ठरावे यासाठी या महिन्यातील रेशनचा पुरवठा एकाचवेळी करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षितता योजनेंतर्गत आणि केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मिळणारे रेशन एकाचवेळी वाटप करण्यात येणार आहे. अंत्योदय, बीपीएल, एपीएल रेशनकार्डासाठी अर्ज केलेल्या नागरिकांना तसेच परप्रांतीय तसेच कार्ड नसणाऱया पात्र लाभार्थींना पुढीलप्रमाणे रेशनचे वाटप करण्यात येणार आहे.
अंत्योदय रेशनकार्डधारकांना (कुटुंबासाठी) 35 किलो तांदूळ राष्ट्रीय अन्न सुरक्षितता योजनेंतर्गत तर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत 5 किलो (प्रति सदस्य) तांदूळ तसेच कुटुंबासाठी 2 किलो तूरडाळ मोफत देण्यात येणार आहे. बीपीएल कार्डधारकांसाठी प्रत्येक सदस्यामागे 10 किलो तांदूळ आणि 2 किलो तूरडाळ व 2 किलो गहू (कुटुंबासाठी) मोफत मिळणार आहे. एपीएल कार्डधारकांना एका सदस्यामागे 5 किलो आणि 2 किंवा त्याहून अधिक सदस्यांसाठी 10 किलो तांदूळ 15 रुपये प्रति किलोप्रमाणे देण्यात येणार आहे.
बीपीएल रेशनकार्डासाठी नव्याने अर्ज केलेल्या नागरिकांना 10 किलो तांदूळ मोफत तर एपीएल कार्डासाठी अर्ज केलेल्यांना 15 रुपये किलो दराने 10 किलो तांदूळ वाटप करण्यात येणार आहे. याबरोबरच परप्रांतीय आणि रेशनकार्ड नसणाऱया पात्र नागरिकांनी मे महिन्यात रेशन मिळविले असल्यास जूनमध्ये 5 किलो तांदूळ आणि 2 किलो हरभराडाळ मोफत देण्यात येणार आहे. मे महिन्यात रेशन न घेतलेल्यांना या महिन्यात 10 किलो तांदूळ आणि 2 किलो हरभराडाळ मोफत देण्यात येणार आहे. सध्या आंतरराज्य आणि आंतरजिल्हा पोर्टेबिलिटी झाली असल्याने कोणत्याही रेशन दुकानात रेशन घेण्याची मुभा नागरिकांना राहणार आहे.
रेशन दुकानात जाताना मोबाईल घेऊन जाणे (ओटीपीसाठी), तसेच मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्स राखणे आवश्यक असल्याची सूचना अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱयांनी केली आहे.