ऑस्ट्रियातून होतेय कार्य : युक्रेनियन इतिहास अन् संस्कृतीचे डिजिटल स्वरुपात जतन
युक्रेनवर शहरांवर रशियाच्या हल्ल्यांमुळे घरे, रुग्णालये, शाळा, शासकीय इमारती नष्ट होत आहेत. युद्धाच्या या संकटाचा आणखीन एक धोकादायक पैलू आहे. युद्धात युक्रेनचा सांस्कृतिक वारसा आणि त्याचे दस्तऐवजही नष्ट होत आहेत. मारियुपोलमध्ये दोन्तस्क रीजनल ड्रामा थिएटर बॉम्बवर्षावात पूर्णपणे नष्ट झाले आहे. युक्रेनच्या 17 ठिकाणांना युनेस्काने जागतिक वारसास्थळांचा दर्जा दिला आहे.
युक्रेनमधील सर्वात जुना मठ स्वियातोर्स्क केव्ह मॉनेस्ट्रीलाही बॉम्बवर्षावामुळे नुकसान झाले आहे. युक्रेनच्या सांस्कृतिक दस्तऐवजांना डिजिटल स्वरुपात वाचविण्याचा एक प्रयत्न आता तेथून हजारो किलोमीटर अंतरावरील ऑस्ट्रियाच्या व्हिएन्नामध्ये सेव्हिंग युक्रेनियन कल्चरल हेरिटेज ऑनलाईन (सूचो) ही संघटना करत आहे.
ऑस्ट्रियन सेंटर फॉर डिजिटल ह्युमॅनिटीज अँड कल्चरल हेरिटेजमध्ये काम करणारे डिजिटल इतिहासकार सबाश्चियन मास्तोरोविक यांची ही संघटना इंटरनेट किंवा अन्य डिजिटल माध्यमातून युक्रेनियन संस्कृतीच्या दस्तऐवजांचे जतन करत आहे. यात पुस्तके, छायाचित्रे, कलाकृतींचा तपशील आणि इतिहासासह स्मारकांच्या व्हर्च्युअल टूरचे व्हिडिओ देखील सामील आहेत.
आतापर्यंत 10 टीबी डाटा स्टोर
हार्वर्डच्या युक्रेनियन रिसर्च इन्स्टीटय़ूट आणि युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टासोबत काम करणाऱया या संघटनेने आतापर्यंत 10 टेराबाइटचा डाटा संग्रहित केला आहे. विद्यार्थीदशेत कोलोनचे राष्ट्रीय संग्रहालय नष्ट होताना पाहिले. सांस्कृतिक वारसा नष्ट होणे म्हणजे संस्कृती नष्ट होण्यासारखे असल्याचे मास्तोरोविक यांनी म्हटले आहे.
सहकार्याची गरज
सांस्कृतिक वारसा असलेल्या कलाकृतींना डिजिटल स्वरुपात संग्रहित करण्याचे काम आम्ही करत आहोत. बहुतांश देश स्वतःच्या सांस्कृतिक-ऐतिहासिक वारशाला डिजिटल फॉरमॅटमध्ये आणत आहेत. परंतु यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्याची गरज आहे. प्रत्येक सांस्कृतिक वारसा जनतेची संपत्ती असते आणि याचे संरक्षण युद्धाच्या सामान्य नियमांमध्ये सामील असल्याचे मास्तोरोविक म्हणाले.
रशियावर आरोप
1954 च्या हेग कन्व्हेंशननुसार ‘प्रोटेक्शन ऑफ कल्चरल प्रॉपर्टी इन द इव्हेंट ऑफ आर्म्ड कॉन्फ्लिक्ट’ आवश्यक आहे. रशिया देखील या कन्व्हेंशनवर स्वाक्षरी करणाऱया देशांमध्ये सामील आहे. रशिया जाणूनबुजून युक्रेनच्या सांस्कृतिक-ऐतिहासिक ओळख असलेल्या स्मारकांना लक्ष्य करत आहे. हा केवळ एका देशावर नव्हे त्याच्या संस्कृतीवर हल्ला असल्याचे उद्गार जर्मनीच्या कमिशनर फॉर कल्चर अँड मीडिया पदावर असलेल्या क्लॉडिया रॉथ यांनी काढले आहेत.