ऑनलाईन टीम / किव्ह :
रशियाने केलेल्या आक्रमणाविरोधात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे. रशियाने युद्धाच्या निमित्ताने निष्पाप नागरिकांचा नरसंहार केल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केला आहे. तसेच युक्रेनमध्ये रशियाला लष्करी कारवाई आणि शिक्षा थांबवण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने द्यावेत अशी मागणी केली आहे. या याचिकेवर पुढील आठवडय़ात सुनावणी होऊ शकते. झेलेन्स्की यांनी ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज चौथा दिवस असून, युद्धाची धग आता तीव्र होत आहे. रशियाने युक्रेनमधील दुसरे सर्वात मोठे शहर असलेल्या खार्किववर आक्रमण केले आहे. युक्रेनच्या अध्यक्षीय कार्यालयाने सांगितले की, रशियाच्या सैनिकांनी खार्किव येथे गॅस पाईपलाईन बॉम्बने उडवली आहे. हा स्फोट मशरूमच्या ढगसारखा दिसत होता. स्पेशल कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन प्रोटेक्शनच्या राज्य सेवेने चेतावणी दिली की, स्फोटामुळे पर्यावरणीय आपत्ती उद्भवू शकते. रहिवाशांना त्यांच्या खिडक्या ओल्या कपडय़ांनी झाकून टाका आणि भरपूर पाणी, द्रव पदार्थ पिण्याचा सल्ला दिला आहे.
खार्किव हे शहर रशियन सीमेपासून 40 किलोमीटर अंतरावर असून, त्याची लोकसंख्या 1.5 दशलक्ष आहे. याच शहरात आता रशियन आणि युक्रेनियन सैन्य आमनेसामने आहेत.