ग्राफिक्स डिझायनरने प्रियकरासोबत उचलली बंदूक : कुणी पतीसोबत घेतेय शस्त्र चालविण्याचे धडे
युक्रेनच्या तुलनेत मोठे सैन्य आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी युक्त असून देखली रशियाला आतापर्यंत युक्रेनवर कब्जा करता आलेला नाही. महिन्याभराच्या संघर्षात मोठे नुकसान झेलून देखील युक्रेन स्वतःच्या रक्षणात मोठय़ा प्रमाणात यशस्वी ठरला आहे. या संघर्षात युक्रेन एक शक्ती म्हणून उदयास येण्यामागे मोठे कारण तेथील लोकांचे शौर्य आहे. रशियाच्या हल्ल्याची शक्यता निर्माण झाल्यापासूनच मोठय़ा संख्येत सर्वसामान्य लोकांनी शस्त्र हाती घेण्यास सुरुवात केली होती.
या सर्वसामान्य नागरिकांमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. या महिलांनी स्वतःच्या देशाच्या सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून रशियाच्या सैन्याला प्रतिकार केला आहे. याचमुळे युक्रेनवर रशियाला पूर्णपणे कब्जा करता आलेला नाही. युक्रेनच्या या महिला सैनिकांनी युद्धात रशियाला मोठे नुकसान पोहोचविले आहे.
युद्धापूर्वीच सुरू झाले होते प्रशिक्षण
युक्रेनला रशियाच्या हल्ल्याचा अंदाज पूर्वीपासून होता. अशा स्थितीत त्याने देशाच्या महिला शक्तीवर भरवसा दाखविला. रशियाच्या हल्ल्यापूर्वीच युक्रेनच्या सर्वसामान्य महिलांनी युद्ध आणि स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. हल्ल्यानंतर या महिला सैनिकांची संख्या अविश्वसनीय स्वरुपात वाढली आहे.
सैन्यात होत आहेत सामील
वेगवेगळय़ा क्षेत्रात कार्यरत महिला अल्पकालीन प्रशिक्षण घेत देशाच्या रक्षणासाठी सैन्यात दाखल होत आहेत. त्यांना बंदूक चालविण्यापासून प्रथमोपचार आणि स्वरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. बहुतांश महिला स्वतःचे काम, घर-कुटुंब आणि मुलांना सोडून आल्या आहेत. सर्वसामान्य युक्रेनियन महिला आणि युवती देशाच्या सुरक्षेसाठी कठोर सैन्य प्रशिक्षण घेत आहेत. देशाच्या रक्षणासाठी सरसावलेल्या महिलांना ऑडेसाच्या एका सैन्य तळावर शस्त्रास्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
देशरक्षणासाठी सरसावल्या
26 वर्षीय ग्राफिक्स डिझाइनयर ऑल्गा मोरॉज हिने स्वतःचा प्रियकर आणि मित्रासोबत देशाच्या रक्षणासाठी शस्त्र उचलण्याचा निर्णय घेतला. ओडेसामध्ये या सर्वांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. महिलांना प्रथमोपचाराचेही प्रशिक्षण देण्यात येत आहे. 25 वर्षीय इंटरनेट मार्केटिंग वर्कर मारिया ही वैद्यकीय आणीबाणीला सामोरे जाण्याचे प्रशिक्षण घेत सैनिकांना मदत करू पाहत आहे. सैन्यात सामील होणाऱया महलांना पुरुषांसोबतच समान स्वरुप असलेले कठोर प्रशिक्षण दिले जात आहे. मारिया स्वतःच्या जोडीदारासोबत हे प्रशिक्षण घेत आहे. युक्रेनच्या सैन्यात सामील होणाऱया या महिलांना युद्धभूमीवर पाठविण्यापूर्वी स्वरक्षणाचे प्रशिक्षण देखील देण्यात येत आहे.