रशियन सैन्याने खार्किव येथे केलेल्या बाँब हल्ल्यात मृत्यूमुखी : किराणा सामान आणण्यासाठी बाहेर पडणे बेतले जीवावर
प्रतिनिधी/ बेंगळूर
युक्रेनमध्ये रशियन सैन्याने केलेल्या बाँब हल्ल्यात कर्नाटकातील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. नवीन शेखरप्पा ग्यानगौडर असे त्याचे नाव असून तो 21 वर्षांचा होता. तो हावेरी जिल्हय़ाच्या राणेबन्नूर तालुक्यातील चळगेरी येथील रहिवासी होता. तो चलन बदलण्यासाठी आणि खाद्यपदार्थ आणण्यासाठी जात असताना त्याचा मृत्यू झाला. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नवीनच्या मृत्यूनंतर युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी मोठय़ा दहशतीखाली वावरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नवीनच्या कुटुंबाचे सांत्वन केले आहे. युरोपियन महासंघाकडूनही या दुदैवी घटनेसंबंधी दुःख व्यक्त करण्यात आले असून पंतप्रधान मोदींना भावना कळविण्यात आल्या आहेत.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध आणखी तीव्र झाले असून युपेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, रशियन सैन्य युक्रेनमधील दुसऱया क्रमांकाचे सर्वात मोठे शहर खार्किववर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. मंगळवारी सकाळपासून या सैन्याकडून सतत गोळीबार, बॉम्बहल्ले, मिसाईल हल्ले होत आहेत. मंगळवारी सकाळी 8 वाजता किराणा साहित्य आणि चलन बदलून आणण्यासाठी नवीन हॉस्टेलबाहेर होता. मात्र, दुर्दैवाने तो बाँबहल्ल्यात सापडला. युक्रेनच्या खार्किव शहरापासून 10 कि. मी. अंतरावर ही घटना घडली आहे. नवीनच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण भारतभर हळहळ व्यक्त होत आहे.
मृतदेह आणण्यास विलंब लागणार
परराष्ट्र मंत्रालयाने नवीनच्या कुटुंबीयांशी संवाद साधला असून युद्धाची परिस्थिती असल्याने सद्यस्थितीत मृतदेह आणणे शक्य होत नाही. मृतदेह सुरक्षित राहण्यासाठी आणि शक्य तितक्या लवकर भारतात आणण्याची सूचना देण्यात आली आहे. सध्या त्याचा मृतदेह खार्किव शवागारामध्ये ठेवण्यात आला आहे.
एमबीबीएसचा विद्यार्थी
नवीन हा खार्किव नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात शिकत होता. तो आपल्या पाच मित्रांसमवेत हॉस्टेलवर वास्तव्यास होता. त्याने सकाळीच आपल्या वडिलांशी फोनवरून संवाद साधला होता. नवीनच्या मित्रांकडून त्याची ओळख पटविण्यात आली. नंतर ही माहिती नवीनचा भाऊ हर्ष याने परराष्ट्र मंत्रालयाला फोन करून दिली. या घटनेविषयी प्रतिक्रिया देताना त्याचे वडील शेखरप्पा गौडर यांनी आपल्या मुलाने सकाळीच फोन केला होता. त्याचा दररोज दोन-तीन वेळा फोन येत होता, असे सांगितले.
मित्रांनी दिली माहिती
नवीनचा मृत्यू झाल्याने त्याच्या मित्रांनाही अश्रु अनावर झाले आहेत. नवीनचा मित्र यशवंत रेड्डी याने प्रतिक्रिया देताना, खार्किव येथे त्याने आपल्याला थंडीपासून बचाव होण्यासाठी जॅकेट खरेदी करून दिले होते. आमची उपासमार होऊ नये यासाठी किराणा आणण्यासाठी गेलेला नवीन आम्हाला कायमचाच सोडून गेला आहे. त्यामुळे आपण खूपच दुःखी आहे, अशा शब्दांमध्ये भावना व्यक्त केल्या. नवीनसोबत हॉस्टेलवर राहणारा त्याचा आणखी एक मित्र श्रीधरन गोपालकृष्ण यानेही घटनेची माहिती दिली. आम्ही सोमवारी रात्रीपर्यंत बंकरमध्येच होतो. मंगळवारी सकाळी सुपर मार्केटमध्ये करेन्सी बदलण्यासाठी रांगेत नवीन थांबला असताना डेसब्रो येथील रोडवर बाँब हल्ला झाला. यावेळी ही दुर्घटना घडली. नवीनने पोलंडला जाण्यासाठी तयारी केली होती, असे त्याने सांगितले.
परराष्ट्र मंत्रालय कुटुंबीयांच्या संपर्कात
खार्किव येथे मंगळवारी सकाळी शेल हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आल्यानंतर या वृत्ताची खात्री भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने करून घेतली. मंत्रालय नवीनच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. नवीनच्या मृत्यूबद्दल त्याच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहे, असे भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
सुविधा देण्याची मुख्यमंत्र्यांकडून विनंती
युक्रेनमध्ये अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना परत आणण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. मुंबई व दिल्लीत येत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी मुंबईत दोन अधिकाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे. युक्रेनच्या ईशान्य भागात कर्नाटकातील अनेक विद्यार्थी संकटात आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांशी चर्चा करून त्यांना भोजन, राहण्याची व्यवस्था करण्याची तसेच त्यांना सुरक्षित स्थळी पाठविण्यासाठी संबंधित अधिकाऱयांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे. रोमानियाच्या सीमेवर प्रचंड गर्दी झाली असून तेथे कर्नाटकातील विद्यार्थ्यांच्याही काळजी घेण्याची विनंती करण्यात आली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केले आहे.
पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून सांत्वन
नवीनच्या मृत्यूचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्यासह अनेकांनी नवीनच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधत सांत्वन केले आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री बोम्माई यांनी नवीनचा मृतदेह भारतात आणण्यासाठी सर्व तऱहेचे प्रयत्न करण्यात येतील. ही बाब परराष्ट्र मंत्रालयाला देखील कळविण्यात आली असून तेथील अधिकाऱयांशी चर्चा करण्यात येत असल्याचे सांगितले. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यासह अनेकांनी नवीनच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.
मुलाला डॉक्टर बनविण्याचे वडिलांचे स्वप्न अधुरे…
एमबीबीएसच्या चौथ्या सेमिस्टरमध्ये शिकत असलेला नवीन डॉक्टर बनावा, असे स्वप्न त्याच्या वडिलांचे होते. शेखरप्पा ग्यानगौडर यांना हर्ष आणि नवीन अशी दोन मुले आहेत. हर्ष हा मोठा मुलगा आहे. शेखरप्पा हे डिप्लोमा इंजिनियर पदवीधर असून त्यांनी यापूर्वी सौदी अरेबियामध्ये एका खासगी कंपनीत नोकरी केली होती. नंतर ते म्हैसूरमधील खासगी कंपनीत काम केले होते. काही वर्षांपासून ते आपल्या चळगेरी या गावात शेती करीत होते. त्यांना त्यांची पत्नी विजयलक्ष्मी या कामामध्ये मदत करीत आहे. अत्यंत कठीण परिस्थितीतून वर आलेल्या या कुटुंबावर नवीनच्या अकाली मृत्यूमूळे मोठा आघात झाला आहे.