सेन्सेक्समध्ये 149 अंकांची घसरण,विप्रो,मारुती सुझुकी नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक कमकुवत संकेताच्या कारणास्तव भारतीय शेअर बाजारामध्ये सोमवारी चढउतार दिसून आला. शेअर बाजार आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी घसरणीसह बंद झाला आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणावाचा परिणाम सोमवारीही शेअर बाजारावर दिसला.
सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 149 अंकांच्या घसरणीसह 57,683 अंकांवर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 69 अंकांच्या घसरणीसह 17206 अंकांवर बंद झाला. सुरुवातीच्या सत्रामध्ये शेअर बाजार घसरणीसह व्यवहार करत होता. मात्र त्यानंतर शेअर बाजाराने बऱयापैकी सावरण्याचा प्रयत्न केला. सोमवारी सकाळी सेन्सेक्स 57551 अंकांवर खुला झाला होता. दिवसभरामध्ये सेन्सेक्सने 58141 अंकांची उंची तर 57167 नीचांकी पातळी गाठली होती. 30 समभागांपैकी 9 तेजीसह आणि 21 घसरणीसह बंद झाले. यातील विप्रो, इन्फोसिस, पॉवरग्रीड कॉर्प, मारुती सुझूकी, नेस्ले, ऍक्सिस बँक, कोटक बँक आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग तेजीमध्ये राहिले. एनटीपीसी, सनफार्मा, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक आणि टीसीएस यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. टायटन, रिलायन्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा स्टील, एसबीआय, बजाज फिनसर्व्ह, डॉ. रेड्डीस लॅब, एअरटेल, एशियन पेंट्स आणि एचडीएफसी यांचे समभाग नुकसानीत होते. लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल घटून सोमवारी 257.27 लाख कोटी रुपयांवर आले आहे. शुक्रवारी ते 260.48 लाख कोटी रुपयांवर होते.
सदरच्या या आठवडय़ात शेअर बाजारामध्ये अस्थिरताच राहणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणावाची पार्श्वभूमी जशीच्या तशी राहिली आहे. दुसरीकडे भारतीयांना युक्रेनमधून परत येण्यासंदर्भात केलेल्या आवाहनाचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदर वाढवण्याच्या शक्यतेचा परिणामही भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.