सेन्सेक्समधील घसरण सत्र सुरुच : निफ्टीही प्रभावीत होत बंद
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात सलगचे घसरण सत्र सुरुच आहे. यामध्ये जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या युक्रेन व रशिया यांच्यामधील संघर्षाचा प्रभाव हा भारतीय शेअर बाजारावर होत गेल्याचे चालू आठवडय़ातील तिसऱया सत्रात बुधवारी पहावयास मिळाले आहे. दिवसभरातील कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स 68.62 अंकांनी नुकसानीत राहिला आहे. ही स्थिती गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेल्या काळजीच्या वातावरणामुळे दिसून येत असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
दिवसभरातील कामगिरीनंतर दिवसअखेर सेन्सेक्स 68.62 अंकांनी प्रभावीत होत 57,232.06 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 28.95 अंकांनी घसरुन निर्देशांक 17,063.25 वर बंद झाला आहे.
आशियासह अन्य बाजारात सकारात्मक स्थिती निर्माण झाली होती. कारण युक्रेनच्या सीमेवर रशियन सैन्यांच्या होत असणाऱया हालचालीनंतर रशियावर पश्चिमेकडील देशांनी निर्बंध लागू करण्यासाठी केलेल्या घोषणेमुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा निश्चय नरम पडून युद्धाचे सावट निवळण्यास मदत होणार असल्याचेही भाकीत काही अभ्यासकांनी यावेळी केले आहे.
सेन्सेक्समध्ये बुधवारी एनटीपीसी, लार्सन ऍण्ड टुब्रो, नेस्ले आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग सर्वाधिक नुकसानीत राहिले आहेत. रशियाने आपले सैन्य युक्रेनच्या पूर्व क्षेत्रात पाठविल्यामुळे तणाव वाढत जाऊन अमेरिकन शेअर बाजार नुकसानीत रहिला होता.
याचदरम्यान बुधवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत काहीशी कमी होत 96.74 डॉलर प्रति बॅरेलवर राहिली आहे. मंगळवारी मात्र ही किमत99.50 डॉलर प्रति बॅरेलवर राहिल्याची नोंद आहे. वरील सर्व घडामोडी येत्या काळात कोणते वळण घेणार त्यावरच भारतीय भांडवली बाजाराचा कल निश्चित होणार असल्याचे शेअर बाजारातील अभ्यासकांनी म्हटले आहे.