कच्च्या मालाचे भाव वधारण्याची भीती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे या संकटाच्या कारणास्तव सिमेंटसह अन्य प्रकारच्या कच्च्या मालाच्या किमती वाढण्याची भीती अधिक आहे. यासोबतच आगामी महिन्यांमध्ये घरांच्या किमतीदेखील वाढणार असल्याचा अंदाज रियल्टी क्षेत्रातील संघटना क्रेडाई यांनी व्यक्त केला आहे.
जागतिक राजकीय संकटामुळे तेलाच्या किमती वाढत जाणार आहेत. तसेच याचा नकारात्मक प्रभाव शेअर बाजाराचं सर्वाधिक नुकसान करणार असल्याचे क्रेडाईचे अध्यक्ष हर्षवर्धन पटोदिया यांनी म्हटले आहे. रशिया व युक्रेन यांच्यातील संघर्षाचा परिणाम म्हणून जागतिक पातळीवरील पुरवठा साखळीमधील अडथळय़ामुळे चिंता निर्माण झाल्याने कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वृद्धी कायम राहण्याची शक्यता अधिक व्यक्त केली जात आहे. यामुळे येत्या काळात इंधनाचे दर वाढणार आहेत. याने मालवाहतूक खर्चात वाढ होणार असून याचा परिणाम किंमती वाढण्यात दिसणार आहे.