रशिया-युक्रेनच्या युद्धात ‘बॅन वॉर’ सुरूच
युक्रेनवर रशियाच्या आक्रमणासंबंधी युरोपीय नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन पुढील आठवडय़ात युरोपचा दौरा करणार आहेत. व्हाइट हाउसच्या माध्यम सचिव जेन साकी यांनी ही माहिती दिली आहे. बिडेन हे 24 मार्च रोजी ब्रसेल्समध्ये नाटो आणि युरोपीय नेत्यांना भेटणार आहेत. उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी मागील आठवडय़ात पोलंड आणि रोमानिया या पूर्व युरोपीय देशांचा दौरा केला होता.
अमेरिका, ब्रिटन यासारख्या अनेक पाश्चिमात्य देशांनी युक्रेनवर हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. आता अमेरिकेच्या निर्बंधांच्या प्रत्युत्तरादाखल रशियानेही नव्या निर्बंधांची घोषणा केली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱयांच्या रशियातील प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. यात अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन आणि संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन देखील सामील असल्याचे रशियाच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.
तर कॅनडाने युक्रेनचे समर्थन केल्यामुळे रशियाने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावरही बंदी घातली आहे. ट्रुडो यांच्यासह 300 हून अधिक कॅनेडियन लोकांवर रशियाकडून प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. यात विदेशमंत्री मेलानी जोली, संरक्षणमंत्री अनिता आनंद आणि जवळपास सर्व खासदार सामील आहेत.
कॅनडाने यावर प्रत्युत्तर दिले आहे. कॅनडाकडून रशियाच्या आणखीन 15 अधिकाऱयांवर कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. यात शासकीय तसेच सैन्याधिकारी सामील आहेत. कॅनडाकडून बंदी घालण्यात आलेल्या रशियन नागरिक आणि संस्थांची एकूण संख्या 500 पर्यंत पोहोचल्याची माहिती पंतप्रधान ट्रुडो यांनी दिली आहे.