कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे युरोपात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून दर 17 सेकंदाने एकाचा मृत्यू होत आहे. ही माहिती जागतिक आरोग्य संघटनेने गुरूवारी दिली. युरोपातील 53 देश या संघटनेचे सदस्य आहेत. या देशांमध्ये एकंदर 1 कोटी 57 लाख रूग्ण आहेत. यापैकी 40 लाख नवे रूग्ण केवळ गेल्या एका महिन्यातील आहेत, असेही संघटनेच्या माहितीत नमूद आहे.
युरोपात कोरोनामुळे होणाऱया मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. आतापर्यंत एकंदर 3 लाख 55 हजार रूग्णांचा मृत्यू झाला असून 53 पैकी 80 टक्क्यांहून अधिक देशांनी गेल्या 14 दिवसांमध्ये मोठय़ा प्रमाणात नवे रूग्ण नोंद केले आहेत. युरोपात आता मृत्यूंचे तर दशलक्ष प्रमाण 100 हून अधिक झाले असून अनेक देश पुन्हा लॉकडाऊनचा आधार घेण्याच्या विचारात आहेत.
शाळा बंदच
ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, स्पेन इत्यादी विकसीत देशांमध्ये प्राथमिक शाळा अद्यापही बव्हंशी बंदच आहेत. अनेक देशांच्या सरकारांनी शाळा उघडण्याचे आदेश देऊनही पालक मुलांसंबंधी धोका पत्करावयास तयार नाहीत. परिणामी ज्या शाळा उघडल्या आहेत, त्यांच्यातही विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प दिसून येते.
आरोग्य यंत्रणा अपुरी
विकसीत देशांमध्येही आता आरोग्यसेवा अपुरी पडू लागल्याने जनतेत असंतोष निर्माण झाला आहे. ऑक्सिजन पुरवठा आणि व्हेंटिलेटर्सची संख्या अपुरी असल्याने रूग्णसंख्या यापेक्षा अधिक वाढल्यास समस्या गंभीर होईल, असा इशारा देण्यात आला असून अनेक देश चिंतेत असल्याचे दिसत आहेत.