जगभरात 1,09,654 बळी : स्पेनमध्ये 24 तासांत 619 जणांचा मृत्यू : रुग्णसंख्येत केवळ अमेरिकेच्या मागे
कोरोना विषाणूचा जगभरात 17 लाख 90 हजार 573 जणांना संसर्ग झाला आहे. यातील 1 लाख 9 हजार 654 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत 4,09,540 जण या संसर्गापासून पूर्णपणे मुक्त झाले आहेत. कोरोना महामारीला सामोरे जाण्यासाठी अमेरिकेच्या प्रशासनाने पहिल्यांदाच सर्व 50 प्रांतांमध्ये एकाचवेळी आपत्ती घोषित केली आहे. व्योमिंग प्रांतात कोरोनामुळे अद्यापही एकही बळी गेलेला नाही. अमेरिकेत आतापर्यंत 20,580 जणांचा मृत्यू झाला आहे. तर नेपाळमध्ये एका धार्मिक कार्यक्रमात सामील झालेल्या तीन भारतीय नागरिकांना संसर्ग झाला आहे. हे भारतीय काठमांडूपासून 135 किलोमीटर अंतरावरील बीरगंज येथील मशिदीत वास्तव्याला होते. नेपाळमध्ये 15 एप्रिलपर्यंत टाळेबंदी लागू आहे.
आरोग्य कर्मचाऱयांना लागण
52 देशांमध्ये कोरोनाच्या विरोधात लढत असलेल्या 22 हजार 73 आरोग्य कर्मचाऱयांना संसर्ग झाला आहे. आरोग्य कर्मचाऱयांसाठी वैयक्तिक सुरक्षा उपकरणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध केली जावीत. आरोग्य कर्मचाऱयांच्या अधिकारांचे रक्षण केले जावे. त्यांना काम करण्यासाठी उत्तम वातावरण उपलब्ध करण्यात यावे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
अमेरिका : दिवसात 1920 बळी
अमेरिकेतील बळींचा आकडा आता 20580 झाला आहे. अमेरिकेच्या थियोडोर रुझवेल्ट या विमानवाहू युद्धनौकेच्या 4800 चालक दलाच्या सदस्यांपैकी 10 टक्के जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था कधी खुली केली जावी हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय ठरणार आहे. हा निर्णय योग्य ठरावा अशी प्रार्थना देवाकडे करत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ब्रिटन : जॉन्सन यांनी मानले आभार
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आयसीयूतून बाहेर पडल्यावर पहिले विधान केले आहे. जॉन्सन यांनी राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या (एनएचएस) कर्मचाऱयांचे आभार मानले आहेत. तुमचे उपकार जीवनभर माझ्यावर राहणार आहेत, असे जॉन्सन आरोग्य कर्मचाऱयांना उद्देशून म्हणाले. ब्रिटन विकसनशील देशांना कोरोनाविरोधी लढय़ासाठी 1523 कोटी रुपयांची मदत करणार आहे.
इटलीत एकूण 19,468 बळी
इटलीत मागील 24 तासांत 619 जणांचा मृत्यू झाला आहे. 5 दिवसांनी पहिल्यांदाच मृतांची संख्या वाढली आहे. यापूर्वी 7 एप्रिल रोजी 604 आणि 10 एप्रिल रोजी 570 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 1,52,271 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. इटलीतील कोरोना संकटाची तीव्रता आता ओसरत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होत आहे.
झुकण्याची गरज नाही : पोप
ईस्टरनिमित्त रविवारी पोप फ्रान्सिस यांनी कोरोना विषाणूच्या भीतीसमोर जगाने झुकण्याची गरज नसल्याचे म्हणत मनोबळ वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. ख्रिश्चनधर्मीयांनी चर्चमध्ये न जाता स्वतःच्या घरांमध्ये प्रार्थना करून सोशल डिस्टंसिंगचे पालन केल्याचे जगभरात आढळून आले आहे. अनेक चर्चमध्ये होणाऱया प्रार्थनेला युटय़ूबवर लाइव्ह स्ट्रिमिंग सर्व्हिसद्वारे लोकांनी अनुभवले आहे.
सौदीत संचारबदी वाढली
सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुलअजील अल-सौद यांनी संचारबंदीच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. संचारबंदीचे पालन करण्याचा निर्देश गृह मंत्रालयाने लोकांना दिला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात सौदी अरेबियात संचारबंदी लागू करण्यात आली होती. देशात आतापर्यंत 10 हजार 512 रुग्ण आढळले असून 52 जणांचा मृत्यू झाला आहे.
साधनसामग्रीचा अभाव : इम्रान खान
पाकिस्तानात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. तेथील रुग्णांची संख्या आता 5030 झाली असून 86 जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाब (2414) आणि सिंध प्रांतात (1318) सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. देशात कोरोनाविरोधी लढय़ासाठी पुरेशी साधने नाहीत. अणुबॉम्ब तयार करणारा देश व्हेंटिलेटर्स निर्माण करू शकत नाही का असे प्रश्नार्थक विधान पंतप्रधान इम्रान यांनी केले आहे.
स्पेनमध्ये 525 जणांचा मृत्यू
स्पेनमध्ये मागील 24 तासांमध्ये 525 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच तेथील एकूण बळींचा आकडा आता 16,972 वर पोहोचला आहे. तर रुग्णांची संख्या 4,167 नव्या रुग्णांसह एकूण बाधितांची संख्या आता 1,66,019 वर गेली आहे. स्पेन अद्याप कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. रुग्णसंख्येप्रकरणी युरोपमधील स्पेन आता केवळ अमेरिकेच्या मागे आहे.
ब्राझीलमध्ये 20 हजारपेक्षा अधिक रुग्ण
ब्राझीलमध्ये बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 20 हजार 727 रुग्ण सापडले आहेत. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयानुसार 24 तासांत 1089 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर दिवसभरात कोरोनामुळे 67 जणांना जीव गमवावा लागला आहे. याचबरोबर मृतांचा आकडा 1124 वर पोहोचला आहे. ब्राझीलमध्ये बाधितांमधील मृत्यूदर 5.4 टक्के आहे.
दक्षिण कोरियात बळी वाढले
दक्षिण कोरियात दिवसभरात 32 नवे रुग्ण आढळले असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 10 हजार 512 रुग्ण आढळले असून 214 जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण कोरियाने संसर्गावर बऱयापैकी नियंत्रण मिळविले आहे.
नेपाळमध्ये टाळेबंदी
भारतातील स्थिती सुधारेपर्यंत नेपाळमधील टाळेबंदी कायम राहणार असल्याचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी म्हटले आहे. भारतात रुग्णांची वाढती संख्या पाहता टाळेबंदी शिथिल करणे योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.