ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशातील कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात प्रदेशात 93 नवे रुग्ण आढळून आले. तर प्रदेशातील 38 जिल्हे हे पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. या जिल्ह्यांमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण नाही आहे. काल दिवसभरात 218 जणांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना अपर मुख्य आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी सांगितले की, प्रदेशात सद्य स्थितीत 2 हजार 032 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.4 टक्के इतके आहे.
- मुख्यमंत्र्यांनी दिले अग्रेसिव्ह टेस्टिंग सुरू ठेवण्याचे आदेश
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी लोकभवनात कोविड 19 याबाबत स्थापन केलेल्या समितींच्या अध्यक्षांची बैठक घेतली. या बैठकीत कोरोनाची स्थिती नियंत्रणात असून देखील अग्रेसिव्ह टेस्टिंग सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच डेल्टा प्लस बाबतच्या माहितीसाठी जीनोम सिक्वेंसिग वाढविण्याचे देखील आदेश दिले आहेत.
- लसीकरणाचा डाटा
उत्तर प्रदेशात आतापर्यंत 5 कोटी 93 लाख 31 हजार 665 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर 50 लाख नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. मागील 24 तासात प्रदेशात 8 लाख 68 हजार 202 जणांना लस देण्यात आली.