प्रतिनिधी/ बेंगळूर
माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांची नात डॉ. सौंदर्या यांनी शुक्रवारी सकाळी बेंगळूरमधील निवासस्थानी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. त्यामुळे येडियुराप्पा यांच्या कुटुंबीयांना धक्काच बसला. सदर घटना समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, निजद सर्वेसर्वा देवेगौडा, कुमारस्वामी, सिद्धरामय्या यांच्यासह अनेकांनी येडियुराप्पा यांना फोन करून त्यांचे सांत्वन केले.
डॉ. सौंदर्या या येडियुराप्पा यांची कन्या पद्मावती यांची मुलगी आहे. त्या कॅनिंगहॅम रोडवरील निवासस्थानी पतीसमवेत वास्तव्यास होत्या. त्या एम. एस. रामय्या इस्पितळात डॉक्टर होत्या. तीन वर्षांपूर्वी त्यांचा डॉ. नीरज यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना 9 महिन्यांचे मूलही आहे. शुक्रवारी सकाळी सौंदर्या यांनी गळफास घेतल्याचे आढळून आल्यानंतर त्यांना तातडीने बेंगळूरमधील मल्लिगे इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. बौरिंग इस्पितळात शवचिकित्सा झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. शवचिकित्सेनंतर डॉ. सतीश यांनी सौंदर्या यांच्या गळ्य़ाला वण आहेत, त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
डॉ. सौंदर्या यांच्यावर बेंगळूर उत्तर तालुक्यातील अब्बीगेरे येथील फार्महाऊसमध्ये लिंगायत पद्धतीनुसार सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. सौंदर्या यांच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.