प्रतिनिधी /बेंगळूर
भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, त्यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र आणि इतरांची चौकशी करण्यासंबंधी दाखल झालेली याचिका लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने फेटाळून लावली होती. याविरोधात सामाजिक कार्यकर्ते टी. जे. अब्राहम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सदर याचिकेवर सुनावणी हाती घेताना न्या. सुनील दत्त यादव यांच्या एकसदस्यिय पीठाने येडियुराप्पा यांच्यासह इतरांना नोटीस जारी केली आहे.
येडियुराप्पा हे सध्या मुख्यमंत्री नाहीत. त्यामुळे त्यांची चौकशी करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही, असा युक्तीवाद सामाजिक कार्यकर्ते टी. जे. अब्राहम यांच्या वकिलांनी केला आहे. दरम्यान, न्यायालयाने माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा, त्यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र, आयएएस अधिकारी डॉ. जे. सी. प्रकाश, माजी मंत्री एस. टी. सोमशेखर या चौघांना नोटीस बजावून सुनावणी ऑगस्टच्या दुसऱया आठवडय़ापर्यंत लांबणीवर टाकली.
येडियुराप्पा, त्यांचे पुत्र विजयेंद्र व निकटवर्तीय अधिकाराचा गैरवापर करून भ्रष्टाचारात गुंतले आहेत. येडियुराप्पांच्या कुटुंबीयांनी बोगस कंपनीत अवैधपणे गुंतवणूक केली आहे. सरकारच्या विविध योजनांमार्फत कोटय़वधी रुपये लाच घेतली आहे, असा आरोप टी. जे. अब्राहम यांनी करत भ्रष्टाचार प्रतिबंधक दलाकडे (एसीबी) तक्रार केली होती. मात्र, एसीबीच्या अधिकाऱयांनी तक्रार रद्द केली होती. त्यानंतर त्यांनी लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात धाव घेत याचिका दाखल करून येडियुराप्पा व त्यांच्या निकटवर्तीयांची चौकशी करावी, अशी विनंती केली होती. या न्यायालयाने येडियुराप्पा व इतरांविरोधात चौकशीसाठी परवानगी घेतली नसल्याचे सांगून अब्राहम यांची याचिका फेटाळली होती. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.