जायंट्स गुप ऑफ बेळगाव मेनतर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त डॉ. रोहन भिसे यांचे व्याख्यान
प्रतिनिधी / बेळगाव
मी करतो आणि मी करू शकतो, हे यंदाच्या जागतिक कर्करोग दिनाचे ब्रीद आहे. कर्करोगाची भीती आणि अचूक वेळी त्याचे निदान न होणे यामुळे कर्करोगाचा विळखा घट्ट होत आहे. यामुळे मनातील विश्वास आणि योग्य काळजी, अचूक उपचार होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. रोहन भिसे यांनी व्यक्त केले. जायंट्स गुप ऑफ बेळगाव मेनतर्फे जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून डॉ. रोहन भिसे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
गुरुवारी येथील आयएमएच्या सभागृहात सदर कार्यक्रम पार पडला. प्रारंभी डॉ. रोहन भिसे, अध्यक्ष संजय पाटील, सचिव विजय बनसूर तसेच स्पेशल कमिटी सदस्य मोहन कारेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी जायंट्स प्रार्थना सादर करण्यात आली. यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शिवराज पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
पुढे बोलताना डॉ. भिसे यांनी कर्करोग होण्याची कारणे, कर्करोगाची लक्षणे आणि उपाय या टप्प्यात सविस्तर माहिती सांगितली. आजची बदलती जीवनशैली आणि तंबाखू-सिगारेट यांचे सेवन याबाबी प्रामुख्याने हे रोग होण्यास जबाबदार असल्याचे सांगितले. प्रारंभी मदन बामणे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी उपाध्यक्ष शिवकुमार हिरेमठ, मधु बेळगावकर, सुनील पवार, अशोक हलगेकर, अजित कोकणे, अविनाश पाटील तसेच जायंट्स मेनचे सदस्य उपस्थित होते. जायंट्स सखीच्या अध्यक्षा नीता पाटील, फेडरेशन संचालिका ज्योती अनगोळकर व जायंट्स सखीच्या सदस्या उपस्थित होत्या. सूत्रसंचालन भरत गावडे यांनी केले. आभार अनिल चौगुले यांनी मानले.