माजी आमदार संजय कदम यांचा आंदोलनाचा इशारा,
प्रतिनिधी/ खेड
लोटे औद्योगिक वसाहतीतील आवाशीनजीकच्या नाल्यात घातक रसायन ओतणाऱया योजना इंडस्ट्रीज व विनविड केमिकल कंपन्यांना बंदची नोटीस बजावूनही अद्याप या कंपन्यांचे उत्पादन थांबलेले नाही. या दोन कंपन्या बंद करण्यासाठी 3 डिसेंबरची डेडलाईन देत तसे न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार संजय कदम यांनी दिला आहे. या प्रश्नी उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्यासमवेत बैठक घेणार असल्याचेही स्पष्ट केले. मुंबई-गोवा महामार्गावरील असगणी, लवेललगतच्या नदी व नाल्यात घातक रसायन ओतण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. 23 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास आवाशीनजीकच्या नाल्यात या दोन कंपन्यांचे टँकर चालक घातक रसायन ओतत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले होते. या प्रकारानंतर 28 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱयांनी दोन्ही कंपन्यांना बंदची नोटीस देत गुन्हेही दाखल केले आहेत. मात्र अजूनही या दोन कंपन्या बंद झालेल्या नाहीत. या प्रश्नी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांची मुंबई येथे भेट घेणार असल्याचे आमदार कदम यांनी सांगितले. 3 डिसेंबरपर्यंत दोन्ही कंपन्या बंद न झाल्यास राष्ट्रवादी आक्रमक भूमिका घेणार असल्याचे शेवटी सांगितले.