प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेच्या राखीव अनुदानांतर्गत विविध योजना राबविण्यात येतात. योजनेंतर्गत लॅपटॉप खरेदीकरिता पन्नास हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत होते. मात्र, निधीचा दुरुपयोग होत असल्याचा मुद्दा उपस्थित झाल्याने लॅपटॉप खरेदी करून देण्यात येणार आहेत. यामुळे यंदा 32 लॅपटॉपचे वितरण महापालिका करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
महापालिकेला मिळणाऱया अनुदानामधून गरजूंकरिता वैयक्तिक योजना राबविण्याकरिता निधी राखीव ठेवण्यात येतो. मागासवर्गियांसाठी 25.30 टक्के, अल्पसंख्याकांकरिता 7.28 टक्के आणि अपंगांसाठी 5 टक्के अनुदान राखीव ठेवण्यात येते. राज्य किंवा केंद्र शासनाकडून मिळणाऱया अनुदानासह महापालिकेच्या उत्पन्नातील निधी राखीव ठेवून गरजूंकरिता योजना राबविण्यात येतात. स्वयंरोजगार, गॅस संपर्क योजना, ड्रेनेज वाहिनी व नळ जेडणी तसेच शैक्षणिक योजनेंतर्गत गरजूंना लॅपटॉप आणि प्रशिक्षण देण्याकरिता राखीव निधी खर्च करण्यात येतो. यंदा कोरोनामुळे राज्य शासनाकडून अद्याप कोणतेच अनुदान मंजूर झाले नाही. मात्र, महापालिकेकडे राखीव असलेल्या अनुदानामधून स्वयंरोजगार व लॅपटॉपचे वितरण करण्यात येणार आहे. मागासवर्गियांसाठी राखीव असलेल्या अनुदानामधून 22 लॅपटॉप आणि अल्पसंख्याकांकरिता राखीव अनुदानामधून 10 लॅपटॉप वितरित करण्यात येणार आहेत.
यापूर्वी लॅपटॉप खरेदीकरण्याकरिता लाभार्थींना पन्नास हजार रुपयांचा धनादेश देण्यात येत होता. धनादेश दिल्यानंतर विद्यार्थी लॅपटॉप खरेदी करतात का? असा मुद्दा अपस्थित झाला होता. अनुदानाचा विनियोग नेमका कोणत्या कारणासाठी केला जातो, असा मुद्दा तत्कालीन मनपा प्रशासक अंमलान बिस्वास यांनी उपस्थित केला होता. लाभार्थींना पन्नास हजार रुपये देण्याऐवजी लॅपटॉप खरेदी करून देण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे महापालिकेने विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सॉफ्टवेअरसह लॅपटॉप पुरविण्याकरिता कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. त्यामुळे आवश्यक साफ्टवेअरसह लॅपटॉप पुरविण्यासाठी 60 ते 70 हजार रुपयांचे कोटेशन दिले होते. केवळ एकच कंत्राटदार 50 हजार रुपयांमध्ये लॅपटॉप पुरवठा करण्यासाठी तयार झाला आहे. त्यामुळे या कंत्राटदाराकरवी लॅपटॉप खरेदी करून वितरित करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. पण विद्यार्थ्यांना आवश्यक सॉफ्टवेअर यामध्ये असेल का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. मात्र, तत्कालीन महापालिका प्रशासकांनी घेतलेल्या निर्णयानुसार यंदा महापालिकाच लॅपटॉपचे वितरण करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.