पुढील महिन्यात आयोजित बीसीसीआय कार्यकारिणी बैठकीत अंतिम निर्णय अपेक्षित
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आयपीएल स्पर्धेची यशस्वी सांगता झाल्यानंतर आता देशांतर्गत क्रिकेट, विविध क्रिकेट स्पर्धांची रुपरेषा व त्यांची ठिकाणे याबद्दल लवकरच निर्णय अपेक्षित आहे. पुढील महिन्यात बीसीसीआय कार्यकारिणीची बैठक होणार असून त्यात या सर्व मुद्यांचा उहापोह होऊ शकतो. आयपीएल फायनल लढतीदरम्यान दुबईत उपस्थित राज्य संघटनांचे प्रतिनिधी व बोर्डाचे काही सदस्य यांच्यात याबाबत प्राथमिक चर्चा झाली. त्यानुसार वरिष्ठ स्तरावरील रणजी चषक व काही टी-20 स्पर्धा जानेवारीत घेण्याचे मंडळाचे प्रयत्न आहेत.
बीसीसीआयने रणजी चषक स्पर्धा जानेवारीत खेळवण्याचा मानस यापूर्वीच व्यक्त केला आहे. मात्र, यासाठी जैवसुरक्षित वातावरण व अन्य खबरदारी घेण्याची तजवीज करावी लागणार असल्याने निवडक राज्यात सामने भरवण्यावर विचार होऊ शकतो.
मागील हंगामापर्यंत इलाईटमध्ये 3 व प्लेटमध्ये 1 एक असे गट होते. पण, यंदा कमी कालावधीत अधिक सामने खेळवावे लागणार असल्याने अधिक गट केले जाऊ शकतात. हे शक्य झाले तर मुश्ताक अली चषक स्पर्धेसाठी पुरेसा अवधी मिळू शकतो. पुढील आयपीएल स्पर्धा एप्रिलमध्ये भरवली जाणे अपेक्षित असून या स्पर्धेदरम्यानच यू-23 व काही अन्य वयोगटातील स्पर्धा आयोजित केल्या जाऊ शकतात. एरवी आयपीएल सुरु होते, त्यावेळी या सर्व प्रकारच्या स्पर्धा संपन्न झालेल्या असतात. पण, यंदा स्थानिक हंगामाची सुरुवात देखील झालेली नाही. त्यामुळे, हा हंगाम अधिक उशिरापर्यंत लांबू शकतो, असे संकेत आहेत.
एरवी आयपीएल स्पर्धेच्या माध्यमातून प्रथमश्रेणी हंगामाची सांगता होते. पण, या हंगामात आयपीएलनंतरही एखादी देशांतर्गत स्पर्धा घ्यावी लागली तर त्यात आश्चर्याचे कारण असणार नाही. आगामी बैठकीत रणजी क्रिकेट स्पर्धेच्या रुपरेषेबद्दल प्रामुख्याने चर्चा होईल. महिला गटात 50 षटकांचे सामने जानेवारीत होऊ शकतात. पण, टी-20 व वयोगटातील स्पर्धेबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही. पुढील महिन्यातील बीसीसीआय कार्यकारिणी बैठकीनंतरच यात स्पष्टता येऊ शकणार आहे.