संगमेश्वर / प्रतिनिधी
संगमेश्वर कळंबस्ते मोहल्ला दर्गेजवळ मलदेवाडी मार्गावर बिबट्याने गाय मारली आहे. याबाबत तंटामुक्ती अध्यक्ष मज्जिद नेवरेकर यांना माहिती दिल्यानंतर मज्जिद नेवरेकर यांनी सहकार्यासह घटनास्थळी जावून पाहिले असता एक गाय मृत अवस्थेत दिसून आली. बिबट्यानेच ही गाय मारली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
फणसवणे पंचक्रोशीतील पाळीव जनावरे मोकाट फिरत असतात. त्यापैकीच एक ही गाय असावी हे जाणुन मज्जिद नेवरेकर यांनी याची खबर वनविभागाला दिली. काही दिवसांपूर्वी कोंड ऊमरे येथील आष्टाचा डबरा या डोहात एक मृत्तावस्थेत सांबर सापडले होता. त्याच्या पाठीदेखील बिबट्या लागला असावा व जीव वाचवण्याच्या नादात डोहात पडुन सांबर मृत्त पावले असावे असा अंदाज काही वयोवृध्द मंडळी वर्तवित आहेत.
याबाबत वनविभागाला विचारले असता सांबाराच्या मृत्यूचा अजूनही रिपोर्ट आला नसल्याचे सांगण्यात आले आहे . मात्र बिबट्याने गाय मारल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.