आमदार योगेश कदम यांची माहिती
विविध शासकीय कार्यक्रमादरम्यान डावलत असल्याची तक्रार
प्रतिनिधी / खेड
रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे हे दापोली विधानसभा मतदार संघात विविध शासकीय कार्यक्रमादरम्यान डावलत असून स्थानिक आमदार म्हणून आपल्या हक्कावर गदा आणण्याचे काम करत आहेत. यापार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हक्कभंग प्रस्ताव सादर केल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, खासदार सुनील तटकरे स्थानिक आमदार म्हणून आपल्याला कुठल्याही प्रकारचे निमंत्रण न देताच अधिकाऱ्यांसमवेत शासकीय बैठक घेत आहेत. १२ ऑक्टोबर रोजी घेतलेल्या आढावा बैठकीचे कुठलेच निमंत्रण दिलेले नाही. मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथील आंबेत पूल कमकुवत झाल्याने जड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे यांच्याकडे निधीसाठी सातत्याने पाठपुरावा केला.
राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे सातत्याने निधीसाठी प्रयत्न केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठकाही घेतल्या. शासनाकडून जेटी बांधण्यासाठी निधी देखील मंजूर झाला. मात्र, कार्यारंभ आदेश येण्यापूर्वीच खासदार सुनील तटकरे यांनी ११ ऑक्टोबर रोजी आमदार अनिकेत तटकरे व माजी आमदारांना घेवून भूमिपूजन केले. शासनाचा निधी म्हणजे खासगी मालमत्ता आहे, असे समजून खासदार तटकरे यांनी स्थानिक आमदार असतानाही कुठल्याही प्रकारचे निमंत्रण दिले नाही.
भूमिपूजनाच्या पाटीवर देखील माझे नाव न टाकता खासदार तटकरे यांनी राष्ट्रवादी पक्षाचाच कार्यक्रम समजून भूमिपूजन केले. खासदार तटकरे यांनी जाणीवपूर्वक निमंत्रण दाण्याचे टाळून राजकारण करण्याचा प्रयत्न करताना आपल्या हक्कावर गदा आणण्याचे काम करत आहेत. याचमुळे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे २० ऑक्टोबर रोजी खासदार तटकरेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करून योग्य कारवाई करण्याची विनंती केल्याचे सांगितले.