स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाची भोस्तेत कारवाई, एकजण अटकेत
प्रतिनिधी / खेड
खेड तालुक्यातील भोस्ते – जलालशहा मोहल्ला येथील जंगलमय भागात बेकायदेशीररित्या गांजाची विक्री होत असल्याची कुणकुण लागताच स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने गुरुवारी दुपारच्या सुमारास धाड टाकली. या धाडीत १६ हजार रुपये किंमतीचा ८०० ग्रॅम गांजा पथकाने जप्त केला. याप्रकरणी मासूम मुनावर कालवे ( २३, रा. भोस्ते जलालशहा मोहल्ला ) यास अटक करण्यात आली आहे.
भोस्ते – जलालशहा मोहल्ला येथे अवैधरित्या गांजा विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस उपअधीक्षक सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण, हेडकॉन्सटेबल राकेश बागुल, संजय कांबळे, संदिप कोळंबेकर, सुभाष भागणे, संजय जाधव, नितीन डोमणे, पोलीस नाईक विजय आंबेकर, सागर साळवी, बाळू पालकर आदींच्या पथकाने जंगलमय भागात धाड टाकून गांजा जप्त केला.
गांजाची विक्री करणाऱ्या मासूम यास अटक करून येथील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या कारवाईने बेकायदेशीरपणे गांजा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने केलेल्या धडक कारवाईचे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.