प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी शहरातील बेर्डे स्टोअर्सचे मालक व रत्नागिरीतील जेष्ठ पत्रकार पुरुषोत्तम उर्फ भाई बेर्डे यांचे वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. भाई बेर्डे हे समाजवादी नेते मधू दंडवते यांचे जवळचे सहकारी होते. आणीबाणीच्या काळात त्यांना अटक देखील करण्यात आली होती. ते काही वर्ष व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तसेच देवरुख येथील मातृमंदिरचे अध्यक्ष होते.
वृत्तपत्र क्षेत्रातही त्यांनी साप्ताहिकाचे संपादक व मालक म्हणून काम केले होते. साप्ताहिक समानता हे वृत्तपत्र त्यांनी अनेक वर्षे चालविले होते. त्यामधून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली होती तसेच त्यांनी अनेक सामाजिक लढ्यांमध्ये नेतृत्व देखील केले होते. असे समाजवादी विचारसरणीचे व्यक्तिमत्व आज हरपले आहे.