वार्ताहर / साखर कोंबे
राजापूर तालुक्यातील जानशी पठार येथे बिबट्याने गोठ्यातील वासरावर हल्ला करून ओढत जंगलात नेत असताना गावातील काही तरूणांनी धाडस दाखवत बिबट्याचा पाठलाग करून वासराला बिबट्याच्या तावडीतून सोडवून आणले. रविवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली.
जानशी पठार येथील राजन कुवेस्कर यांच्या यांच्या घरालगत असलेल्या गोठ्यामध्ये मध्यरात्री 1 च्या सुमारास बिबट्या शिरला. तब्बल 35 किलो च्या वासरावर त्याने हल्ला चडविला, त्याचे मजबूत दावे त्याने तोडले, त्याचवेळी त्याने गाईवरही पंजा मारला, गोठ्यात सुरू असलेली ही झटापट ऐकून राजन कुवेसकर यांचे पुतणे निखिल यांना जाग आली. त्यांनी खिडकी उघडून पाहिले असता बिबट्या वासराला तोंडात धरून जात होता.
त्यानंतर निखिल ने जोरजोरात ओरडायला सुरूवात केली. त्याची ओरड ऐकून चुलते सुधीर आणि राजन कुवेसकर यांच्या सहित आजुबाजूची तरुण मंडळी गोठ्याकडे धावतच निघाली आणि मग सुरू झाला वाघाचा थरारक पाठलाग. मध्यरात्र असूनही हातात काढ्या घेऊन तरूणांनी बिबट्याचा पाठलाग केला. बिबट्याने जवळपास एक किलोमीटर लांब जंगलात गेल्यावर एका घळीत गेल्यावर वासराला सोडले. बंड्या कुवेस्कर यांनी रांगत जाऊन त्या घळीतून वासराला बाहेर काढले.
मध्यरात्री वासरला अणसुरे येथील पशुवैद्यकीय अधिकारी यशवंते यांच्याकडे नेऊन टाके घालन्यात आले. औषधोपचार केल्यावर आता वासराच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. राजन कुवेस्कर, सुधीर कुवेसकर, निखिल कुवेस्कर, प्रभाकर कुवेस्कर, आबा कुवेस्कर, बंड्या कुवेसकर आदींनी धाडसाने वासराला बिबट्याच्या तावडीतून सोडवत जीवदान दिले.