सूचना करूनही कार्यवाही नसल्याने रत्नागिरी पं.स.सभेत सदस्यांची नाराजी
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी तालुक्यात शाळांना पुरवठा होणारा पोषण आहाराचा दर्जा सुधारण्याबाबत अजूनही संबधित ठेकेदार कंपनीकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. वेळोवेळी सभांमध्ये विद्यार्थ्यांच्या पोषण आहार प्रश्नी चर्चा होते. पण त्याकडे शाळांच्या मुख्याध्यापकांकडूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यासाठी शाळांचे मुख्याध्यापक, आहार पुरवठादार ठेकेदार, पदाधिकारी, पं.स.सदस्य, अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय पंचायत समिती सभेत घेण्यात आला.
रत्नागिरी पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा नूतन सभापती संजना माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत मागील मासिक सभेत शालेय स्तरावर पुरवठा होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराचा विषय पुन्हा सदस्यांनी उपस्थित केला. निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरवठा होत असेल तर शाळांच्या मुख्याध्यापकांनी हा आहार स्वीकारता कामा नये. त्याबाबत शिक्षण विभागाकडून सर्व शाळास्तरावर तसेच पुरवठा करणाऱ्या ठेकेदारालाही कडक सूचना दिल्या जाव्यात असे सांगण्यात आले होते.