प्रतिनिधी / रत्नागिरी
पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलिंडरची भरमसाठ दरवाढ करणार्या मोदी सरकारच्या विरोधात रत्नागिरीत शिवसेना आक्रमक झाली आहे. रत्नागिरीतील जिल्हा परिषद गट मिरजोळे व नाचणे येथील शिवसैनिकांनी शुक्रवारी रत्नागिरी रेल्वे स्थानक फाट्यावर आंदोलन करत निषेध केला. यावेळी मोदी सरकार हाय हाय, पेट्रोल-डिझेलची दरवाढ करणार्या मोदी सरकारचा धिक्कार असो, पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ मागे घ्या, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, जिल्हा प्रमुख विलास चाळके, तालुका प्रमुख बंड्या साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषदचे बांधकाम सभापती बाबुशेठ म्हाप व नाचणे जि. प. गट सदस्य प्रकाश रसाळ यांनी केले होते. रेल्वेस्थानक फाटा येथील मुख्य रस्त्यांवर केलेल्या या आंदोलनात शिवसैनिकांबरोबरच पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा फटका बसलेले सामान्य नागरिकही सहभागी झाले होते.