गावांमध्ये तणाव, प्रशासनाने मागवला पोलिस बंदोबस्त
दापोली / प्रतिनिधी
दापोली तालुक्यातील मुरुड येथील बहिरीचा कोंड येथील रहिवाशी कीर्ती कमलाकर घडसे यांनी केलेल्या अर्जानुसार गावातील सरकारी गावठाणातील अतिक्रमण उद्या मंगळवारी 21 सप्टेंबर रोजी महसूल विभागाकडून काढून टाकून पायवाट मोकळी करण्यात येणार आहे. यामुळे गावात तणावाचे वातावरण असून महसूल विभागाने दापोली पोलिस निरीक्षक यांना पोलीस बंदोबस्त पुरवण्यात बाबत पत्र दिलेले आहे. यामुळे गावात नेमके काय होते. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
घडसे यांच्या तक्रारी नुसार तहसीलदार वैशाली पाटील यांनी 19 जानेवारी 2021 रोजी सदर मंडळाला नोटीस बजावली होती. त्यांनी सदर अतिक्रमण काढून टाकण्याचा आदेश दिला होता. शिवाय शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण काढून टाकून पायवाट मोकळी न केल्यास तहसील कार्यालयाकडून अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई करण्यात येईल व अतिक्रमण काढून टाकण्याचा खर्च जमीन महसुलाची थकबाकी म्हणून भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 447 अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल अशी नोटीस बजावली होती. तरी देखील मंडळाकडून याबाबत कोणतीही कारवाई न करण्यात आल्याने उद्या 21 सप्टेंबर रोजी सदर बांधकाम महसूल विभागाकडून काढून टाकण्यात येणार आहे.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता महसूल विभागाकडून दापोली पोलीस स्थानकात पोलिसांकडून पोलिस बंदोबस्त मागवला आहे. यामुळे गावात तणावाचे वातावरण असून आज नेमके काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.