सुबहान तांबोळी यांनी प्लाझ्मा डोनेट करून जपली सामाजिक बांधिलकी
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरीती नुकतेच प्लाझ्मा थेरपी सेंटरचे ऑनलाईन उदघाटन करण्यात आले. या ठिकाणी प्लाझ्मा दान करण्याचे बहुमोल काम रत्नागिरीतील रिक्षा चालक सुबहान तांबोळी यांनी केले आहे. त्यांच्या दातृत्वाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून सामाजिक काम करणारे शिरगाव गणेशवाडी येथील सुबहान अजीज तांबोळी यांनी कोविड-19 च्या महामारीत “कोविड योद्धा’ म्हणून काम केले. या महामारीत त्यांनी प्लाझ्मा दान केले असून ग्रामीण भागातून प्लाझ्मा दान करणारे ते पहिले ठरले आहेत.
रिक्षा व्यवसायातून मिळालेल्या कमाईतील काही एक भाग समाजासाठी जावा, असे त्यांचे प्रयत्न असतात. या आधी शिरगाव येथे वाहतूक कोंडीत सापडलेल्या दहावी-बारावीच्या मुलांना कॉलेजपर्यंत मोफत सोडण्याचे काम करून त्यांनी बांधिलकी जपली होती. सामाजिक कार्य करताना कोविड-19 महामारीला सुरवात झाल्यानंतर त्यांनी रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयापर्यंत नेण्याचे काम केले. तसेच चारचाकीने जिल्ह्यात गरजूंना औषधे पोचविण्याचे काम ते करत होते. त्यांना कोविड योद्धा म्हणून गौरविण्यात आले होते. रत्नागिरीत प्लाझ्मा थेरपीचे युनिट तयार केले. या युनिटमध्ये सर्वप्रथम त्यांनी रविवारी (ता. 18) स्वतः प्लाझ्मा दान केले. त्यामुळे ग्रामीण भागात रिक्षा व्यवसाय करणारे व प्लाझ्मा दान करणारे ते पहिले रिक्षाचालक ठरले आहेत. प्लाझ्मा दान करण्याचा कार्यक्रम उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी लक्ष्मानारायण मिश्रा यांच्या उपस्थितीत झाला.