कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे देवस्थान विश्वस्त समितीचा निर्णय
प्रतिनिधी / चिपळूण
श्री क्षेत्र परशुराम येथील भगवान श्री परशुराम मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला जत्रोत्सव साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने सूचित केलेल्या नियमांस अधीन राहून 11 मार्च रोजीचा महाशिवरात्र जत्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय संस्थान श्री भार्गवराम परशुराम विश्वस्त समितीच्यावतीने घेण्यात आला आहे.
श्री क्षेत्र परशुराम येथील भगवान श्री परशुराम मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला जत्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. या जत्रोत्सवासाठी दूरवरून भाविक येतात. मात्र यावेळी कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे येणाऱया भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून हा उत्सवच रद्द करण्यात आला आहे. महाशिवरात्रीचे दिवशी भगवान श्री परशुराम मंदिर पूर्ण वेळ बंद ठेवण्यात येणार असून परंपरागत धार्मिक कार्यक्रम मर्यादित स्वरूपात शासनाच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येणार आहेत.
महाशिवरात्री दिवशी प्रत्यक्ष दर्शन सेवा बंद ठेवण्यात येणार असली तरी भाविकांसाठी खास फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून भगवान श्री परशुराम यांचे फेसबुकद्वारे ऑनलाईन दर्शनाची सोय करण्यात आली आहे. सकाळी 8.00 ते सायंकाळी 800 पर्यंत ही सुविधा उपलब्ध असणार आहे.