आरोपांचा स्पष्ट इन्कार : सीडी बनावट असल्याचा दावा
प्रतिनिधी / बेंगळूर
वादग्रस्त सीडीप्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून पाटबंधारेमंत्री तसेच बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी बुधवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षहिताचा विचार करून आपण हे पाऊल उचलले आहे. आपल्याविरोधात विरोधकांनी हे कुभांड रचलेले आहे असे त्यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना पाठविलेल्या त्यांच्या राजीनामापत्रात स्पष्ट केले आहे.
रमेश जारकीहोळी यांनी आपले राजीनामापत्र मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना बुधवारी पाठविले. मुख्यमंत्र्यांनी ते राज्यपाल वजुभाई वाला यांच्याकडे संमतीसाठी पाठवून दिले. राज्यपालांनी रमेश जारकीहोळी यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
परिस्थितीची कल्पना दिली
मुख्यमंत्र्यांनी रमेश जारकीहोळी यांचे बंधू आमदार भालचंद्र जारकीहोळी यांना आपल्या निवासस्थानी बोलावून रमेश जारकीहोळी यांच्या राजीनाम्यासंबंधीच्या अनिवार्य परिस्थितीची जाणीव मुख्यमंत्र्यांनी त्यांना त्यांचे बंधू भालचंद्र जारकीहोळी यांच्याकरवी करून दिली, असे सांगितले जात आहे.
पक्षहित आणि राज्यात होणाऱया विधानसभेच्या 3 पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजीनामा देणे आवश्यक आहे. पक्षश्रेष्ठींनी तशी सूचना दिली आहे. सीडीविषयीच्या प्रकरणाची शहानिशा झाल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देता येईल, असे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी भालचंद्र जारकीहोळी यांना सांगितल्याचे समजते.
बदनाम करण्याचे कारस्थान
आपल्याला बदनाम करण्याचे कारस्थान रचण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यानंतर आपण निर्दोष ठरणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची कोंडी करण्याचा डाव काही जणांनी रचला आहे. आपण या प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असा विश्वास रमेश जारकीहोळींनी प्रतिक्रिया देताना व्यक्त केला आहे.