‘डॉ. रेड्डीज लॅब’कडे जबाबदारी
नवी दिल्ली
औषध नियंत्रकांनी परवानगी दिल्यानंतर रशियाने विकसित केलेली स्पुटनिक व्ही कोरोना प्रतिबंधक लस भारतात दाखल झाली आहे. या लसीच्या भारतातील मानवी चाचण्यांच्या दुसऱया व तिसऱया टप्प्याला लवकरच प्रारंभ होणार आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत या चाचण्या पूर्ण होतील, अशी अपेक्षा असून त्यासंबंधीची जबाबदारी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने स्वीकारली आहे. रशियाने ऑगस्ट महिन्यात स्पुटनिक व्ही लसीची नोंदणी केली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये या लसीच्या चाचण्या सुरू झाल्या. मात्र त्याआधीच तिच्या वापराबद्दलची परवानगी रशियाच्या औषध नियंत्रकांनी दिली होती. अशी परवानगी मिळविणारी ही जगातील पहिली लस आहे. स्पुटनिक व्ही लसीचा पहिला डोस रशियातील स्वयंसेवकांना दिल्यानंतर 21 दिवसांनी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या स्वयंसेवकांमध्ये उत्तम प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे दिसून आले होते.