वृत्तसंस्था/ व्हिएन्ना
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या इरेस्टी बँक खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाच्या आंद्रे रूबलेव्हने एकेरीची अंतिम फेरी गाठली. 2020 च्या टेनिस हंगामात रूबलेव्हने आतापर्यंत पाच स्पर्धामध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे.
शनिवारी झालेल्या उपांत्य सामन्यात रूबलेव्हने दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनचा 6-4, 4-1 असा पराभव केला. या सामन्यात दुसरा सेट चालू असताना अँडरसनच्या उजव्या पायामध्ये स्नायू दुखापत झाल्याने त्याने हा सामना अर्धवट सोडला. इव्हान्स आणि सोनेगो यांच्यातील विजयी खेळाडूबरोबर रूबलेव्हचा अंतिम सामना होईल. सोनेगोने शुक्रवारी या स्पर्धेत सर्बियाच्या जोकोव्हिचला 6-2, 6-1 अशा सेट्समध्ये पराभवाचा धक्का दिला होता.