युक्रेनियन खासदाराचा आरोप : अनेक मुलींवर फासावर लटकविले
रशियाने केलेल्या आक्रमणामुळे युक्रेनमध्ये विध्वंसाच्या खुणा अनेक ठिकाणी दिसून येत आहेत. ठिकठिकाणी मृतदेह पडले असून या युद्धात युक्रेनच्या नागरिकांनी बरेच काही गमावले आहे. रशियाच्या सैनिकांनी 10 वर्षीय मुलींवर बलात्कार केला आणि त्यांच्या शरीरावर रॉडने निशाण तयार केल्याचा आरोप युक्रेनच्या खासदार लेसिया वासिलेंक यांनी केला आहे. तसेच त्यांनी या गुन्हय़ाच्या पुष्टीसाठी अनेक छायाचित्रेही ट्विट केली आहेत. रशियाच्या सैनिकांनी निष्पाप मुलींसोबत क्रौर्याची परिसीमा ओलांडली असल्याचे वासिलेंक यांनी म्हटले आहे.
रशियन सैनिकांनी बलात्कार केलेल्या मुलींच्या शरीरावर तप्त रॉडने नाझीचे चिन्ह काढले आहे. खासदार वासिलेंक यांनी स्वतःच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सैनिकांच्या क्रौर्याची छायाचित्रे शेअर केली आहेत. रशियन सैनिक नागरिकांना लुटतात, बलात्कार करतात आणि मग मारून टाकतात असे त्यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
बलात्कार पीडितांकडून आत्महत्या
रशियाचे सैनिक 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांवरही बलात्कार करत आहेत. तर अनेक महिलांनी लैंगिक शोषणानंतर आत्महत्या केली आहे. तर बलात्कारानंतर अनेक जणी वाचू शकल्या नाहीत असे त्या म्हणाल्या. या सर्व प्रकारामुळे रशियावर आता जगभरातून टीकेचा भडिमार होऊ लागला आहे.
बलात्कारानंतर हत्या
बलात्कार केल्यावर रशियाच्या सैनिकांनी काही महिलांना फासावर लटकविले आहे. आम्ही या अन्यायाच्या विरोधात पुरावे जमवत आहोत. युद्धादरम्यान झालेल्या या गुन्हय़ाप्रकरणी आम्ही युरोपियन कन्व्हेंशन ऑन ह्युमन राइट्सकडे दाद मागणार आहोत. युक्रेनच्या सरकारने बलात्कार पीडित महिला अन् मुलींना मदत करावी, असे खासदारांनी म्हटले आहे.
अमेरिकेकडून टीका
अमेरिकेच्या विदेश विभागाचे प्रवक्ते नेड प्राइसे यांनी रशियाकडून युक्रेनवर करण्यात आलेला हल्ला आणि रशियन सैनिकांच्या क्रौर्याबद्दल टिप्पणी केली आहे. यातना, बलात्कार आणि नागरिकांना त्यांच्या कुटुंबांसोबत मारले गेल्याचे विश्वसनीय अहवाल पाहिले आहेत. पुतीन यांचे सैन्य भूसुरुंगांसह अत्याचारांची अनेक दुस्वप्ने मागे सोडून गेल्याचे प्राइसे यांनी म्हटले आहे.