मास्को –
जवळपास सर्वच देशांमध्ये कोरोनासंदर्भातील लसीकरणाला वेग आला असला तरी रुग्णसंख्येमध्ये मात्र वाढ होताना दिसते आहे. सदरची वाढ ही सर्वच देशांसाठी चिंता वाढवणारी असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. अलीकडे एकाच दिवशी रशियात 672 इतक्या जणांनी प्राण गमावला असल्याचे दिसून आले असून रुग्णसंख्याही वाढल्याने प्रसासन अधिक सतर्क झाले आहे. यासंदर्भात विविध देशांनी निर्बंधांच्या माध्यमातून कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले आहेत. कोरोनाच्या संदर्भातील डेल्टा व्हेरीएंटने जगभरातील 100 देशांपर्यंत आपले पाय पसरले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान रशियामध्ये एकाच दिवशी कोरोनाने 672 लोकांचा जीव घेतला आहे. त्यामुळे रशियाने याची गंभीर दखल घेत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे नियोजन तातडीने केले असल्याचे समजते. कोरोना संदर्भात नेमलेल्या टास्क फोर्सने, त्याच दिवशी 24 तासांमध्ये 23 हजार नवीन कोरोना रुग्ण आढळले असल्याचे म्हटले आहे. 17 जानेवारीनंतरची ही सर्वात मोठी संख्या आहे, असेही रशियन सरकारने म्हटले आहे. एकटय़ा मॉस्को राजधानीमध्ये 7500 नवे कोरोनारुग्ण आढळून आले आहेत. रशियातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता वाढून 55 लाख 38 हजारवर पोहोचली आहे. या देशामध्ये 1 लाख 35 हजार जण कोरोनाने मृत्युमुखी पडले आहेत. एप्रिल 2020 ते एप्रिल 2021 या काळामध्ये रशियामध्ये अंदाजे 2 लाख 70 हजार जणांनी कोरोनामुळे जीव गमावला असल्याचे देशातील सांख्यिकी खात्याकडून सांगण्यात आले आहे.