अमेरिका-युरोपशी तणाव ः भारताबाबत पुतीन यांच्या भूमिकेकडे नजर
वृत्तसंस्था / मॉस्को
अमेरिका आणि युरोपीय देशांसोबत वाढत्या तणावादरम्यान स्वतःच्या शत्रू देशांची यादी प्रकाशित करण्याची घोषणा रशियाने केली आहे. लवकरच ही यादी प्रसिद्ध होणार आहे. मित्रदेशांसाठी आम्ही पूर्वीच मापदंड निश्चित केले आहेत असे रशियाचे विदेशमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी सांगितले आहे. या घोषणेनंतर अमेरिका आणि युरोपीय देशांसोबत सुरू असलेल्या तणावात रशिया मागे हटणार नसल्याचे मानले जाऊ लागले आहे. राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी रशियाच्या शत्रूंना मर्यादेत राहण्याचा इशारा दिला आहे.
सरकारकडे विशिष्ट निर्देश असून या कार्यातील मापदंड अत्यंत स्पष्ट आहेत. याचमुळे या यादीकरता मोठी प्रतीक्षा करावी लागणार नसल्याचे लाव्हरोव्ह म्हणाले. मागील आठवडय़ातच पुतीन यांनी मैत्रिपूर्ण संबंध नसलेल्या देशांच्या दूतावासांमधील कर्मचाऱयांची संख्या मर्यादित करण्याचा आदेश दिला होता.
शत्रूदेशांची ओळख पटविणार
रशियाबद्दल शत्रुत्वाचा भाव बाळगणाऱया देशांची यादी तयार करण्याचा निर्देश पुतीन यांनी रशियाच्या विदेश मंत्रालयाला दिला होता. यानंतर लाव्हरोव्ह यांच्या देखरेखीत अशा देशांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. रशिया ही यादी जाहीर करणार नाही, पण अशा देशांबद्दल कठोर धोरण स्वीकारणार असल्याचे तज्ञांचे मानणे आहे. यातील बहुतांश देश युरोपमधील असतील.
युरोपीय देशांसोबत कूटनीतिक युद्ध
सध्या अनेक युरोपीय देशांसोबत रशियाचे कूटनीतिक युद्ध सुरू आहे. मागील एक महिन्यात अमेरिका, स्वीडन, रोमानिया, चेक प्रजासत्ताक आणि इटलीने रशियाच्या मुत्सद्यांना देशाबाहेर काढले आहे. प्रत्युत्तरादाखल रशियानेही या देशांच्या मुत्सद्यांना देश सोडण्यास सांगितले आहे. चेक प्रजासत्ताकने तर रशियाच्या अधिकाऱयांवर स्फोटात सामील असल्याचा आरोप केला आहे. तर रोमानियाने शेजारी देश चेक प्रजासत्ताकला पाठिंबा दर्शत रशियाच्या अधिकाऱयाला देशाबाहेर काढले आहे.
निर्बंधांचा खेळ
रशिया आणि अमेरिका परस्परांना निर्बंधांचा वर्षाव करत आहेत. जो बायडेन अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी निवडणुकीतील रशियाचा हस्तक्षेप आणि गोपनीय सैन्य दस्तऐवज चोरण्यासाठी हॅकिंगचा आरोप करत निर्बंध लादले होते. अमेरिकेने रशियाच्या 10 मुत्सद्दय़ांना त्वरित देश सोडण्याचा आदेश दिला होता. ज्यानंतर रशियाने अमेरिकेच्या 10 मुत्सद्दय़ांना बाहेर काढले आहे.
भारतासोबत संबंध अमेरिकेचा घनिष्ठ सहकारी असूनही भारताचे रशियासोबत मधूर संबंध आहेत. अमेरिकेच्या धमक्यांना भीक न घालता भारताने रशियासोबतचा एस-400 क्षेपणास्त्र यंत्रणेचा व्यवहार रद्द केलेला नाही. कोरोनाची स्थिती सुधारल्यास चालू वर्षाच्या अखेरीस पुतीन दिल्लीचा दौरा करू शकतात. अशा स्थितीत या यादीत भारताचा समावेश होण्याची दुरापास्त शक्यता नाही.