आण्विक प्रकल्पावर करणार फॉल्स फ्लॅग अटॅक, युक्रेनच्या माथी मारणार दोष : फ्रीजरमध्ये ठेवले सैनिकांचे मृतदेह
युक्रेन युद्धाच्या तिसऱया आठवडय़ातही निर्णायक विजयापासून दूर राहिलेल्या रशियाच्या सैन्याचा क्रूर कट समोर आला आहे. कीव्हमध्ये आतापर्यंत दाखल होऊ न शकल्याने रशियाच्या सैन्याने आण्विक हल्ल्याच्या योजनेवर काम करणे सुरू केले आहे. यात रयिशाने चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पावर फॉल्स फ्लॅग अटॅक (स्वतः हल्ला करून इतरांच्या माथी दोष मारणे) करणे सामील आहे.
रशिया आगामी काही दिवसांमध्ये स्वतःच चेर्नोबिलवर हल्ला करणार आणि युक्रेनच्या सैनिकांवर हल्ल्याचा आरोप करणार आहे. तसेच सैनिकांचे मृतदेह तेथेच फेकून देणार आहे. याच्या माध्यमातून युक्रेनच्या सैनिकांनी अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दुष्प्रचार रशिया करणार आहे. या कटासाठी रयिशाने काही युक्रेनियन सैनिकांचे मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवल्याचा दावा युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणांनी केला आहे.
होस्टोमोल शहरात अलिकडेच युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या सैन्य ताफ्यातील असे अनेक फ्रीजर ताब्यात घेतले आहेत. याचदरम्यान अमेरिकेकडून युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यात आल्यास हल्ला करू अशी धमकी रशियाने दिली आहे. तर रशियाचे सैन्य शनिवारी युक्रेनची राजधानी कीव्हपासून 25 किलोमीटर अंतरावरील ब्रोवरी येथे पोहोचले आहे.
महापौराचे अपहरण
कीव्हनजीकच्या मॅलिटोपोल शहराचे महापौर इवान फेडरोव्ह यांचे रशियाच्या सैन्याने अपहरण केले आहे. रशियाच्या सैन्याने शहरावर कब्जा केल्यावरही फेडरोव्ह यांनी रशियाचे आदेश मानण्यास नकार दिला होता. महापौराच्या मुक्ततेसाठी फ्रान्स आणि जर्मनीने रशियाला आवाहन केले आहे. लवीवमध्ये लोकांनी या घटनेच्या विरोधात निदर्शने केली आहेत.
आर्ट ऑफ लिव्हिंगचा पुढाकार
आर्ट ऑफ लिव्हिंगकडून हंगेरी, पोलंड, स्लोवाकिया, रोमानिया, जर्मनी आणि बुल्गारियामध्ये युक्रेनियन शरणार्थींसाठी शिबिरांची स्थापना करण्यात आली आहे. 4 हजारांहून अधिक शरणार्थींना तेथे आश्रय देण्यात आला आहे. वैद्यकीय सामग्री, अन्न उपब्लध करविण्यात आले आहे. शरणार्थींसाठी पोलंडमध्ये 40 घरांचीही निर्मिती करण्यात आली आहे.
मशिदीवर रशियाचा हल्ला
पूर्व युक्रेनच्या मॅरियोपूलमध्ये शनिवारी रशियाच्या हल्ल्यात 80 लोक मारले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. या लोकांनी मशिदीत आश्रय घेतला होता. रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनचे 1300 सैनिक मारले गेले आहेत. कीव्हमधून शनिवारी सुमारे 2000 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.